कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशी महिलेवर हल्ला; बोटे पिरगळली, हाताचा चावाही घेतला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण येथून मुंबईला निघालेल्या प्रवाशी महिलेवर एका माथेफिरू महिलेने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. सकाळी गर्दीच्या वेळी लोकलमध्ये चढताना हा प्रकार घडला. धक्कादायक म्हणजे हल्लेखोर महिलेने तक्रारदार यांच्या हाताची बोटे पिरगळली आणि दंडाचा चावाही घेतला. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण पूर्वेतील मलंगगड रोड परिसरात राहणाऱया तक्रारदार महिला या अंधेरी येथे नोकरीला आहेत. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्या कामावर जाण्यासाठी फलाट क्रमांक सहावर उभ्या होत्या. त्यांनी सीएसएमटीकडे जाणारी जलद लोकल पकडली. या वेळी फलाटावर गर्दी जास्त असल्याने गाडी फलाटावर थांबताच रेटारेटी सुरू झाली. लोकलमधून खाली उतरणाऱया आणि लोकलमध्ये चढणाऱया महिलांमध्ये चेंगराचेंगरी झाली. या वेळी लोकलमधून उतरत असलेल्या संतप्त प्रवाशी महिलेने तक्रारदार यांच्या हाताची बोटे पिरगळली आणि कडकडून चावा घेतला.

सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू

हल्ल्यात महिलेच्या हाताला दुखापत झाली आहे. या प्रकरणी जखमी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अनोळखी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोर महिलेचा शोध घेत ओळख पेटवण्याचे काम सुरू केले आहे. मात्र या घटनेनंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.