
एका खासगी रुग्णालयातील मराठी स्वागतिका सोनाली कळासरे हिला बेदम मारहाण करून फरार झालेला परप्रांतीय आरोपी गोकुळ झा (27) याने पोलिसांना चकवा देण्यासाठी स्वतःचा लूकच बदलला. त्याने सलूनमध्ये जाऊन केस बारीक केले, डिझायनर टीशर्ट घातला. पण ओळख लपवण्याचा गोकुळचा डाव उधळला गेला आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे तो गजाआड झाला.
सोनालीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी गोकुळ झा याच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंबरनाथच्या नेवाळी नाका परिसरात त्याचा वेश पालटून तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना स्थानिक नागरिकांनी त्याला चोप देत मानपाडा पोलिसांच्या हवाली केले.
गोकुळचा कोर्टातही राडा
कोर्टात वकिलांचा युक्तिवाद सुरू असताना आरोपी गोकुळला घातलेला बुरखा काढण्यात आला. तो कोर्टात अरेरावी करू लागला, तमाशा करू लागला. पोलिसांनाही धक्काबुक्की करत होता. यावेळी न्यायाधीशांनी सरकारी वकिलांचा युक्तिवाद थांबवून त्याला ताकीद दिली. हा तमाशा बंद कर नाहीतर कोर्टाच्या कामकाजात अडथळा आणल्याच्या कलमाखाली तुझ्यावर गुन्हे दाखल करू अशी तंबी दिली. त्यानंतर गोकुळ गप्प झाला, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली. गोकुळला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
रेकॉर्डवरील गुन्हेगार
आरोपी गोकुळ झा हा कल्याण पूर्वेतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात उल्हासनगर, मानपाडा, कोळसेवाडी आदी पोलीस ठाण्यांत विविध गुन्हे दाखल आहेत. तो नुकताच एका गुन्ह्यातून जामिनावर सुटून बाहेर आला आहे. तसेच गोकुळ झा हा कल्याण पूर्व परिसरात फेरीवाल्यांकडून हप्ते वसूल करणे, दमदाटी करणे, भाईगिरी करणे, अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय आहे.
शिवसेनेची मानपाडा पोलीस ठाण्यावर धडक
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे आणि धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली मानपाडा पोलीस ठाण्यावर धडक दिली. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांची भेट घेऊन गोकुळ झा याच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी करत निवेदन दिले. यावेळी उपजिल्हाप्रमुख भिमसेन मोरे, महिला जिल्हा संघटक वैशाली दरेकर, उपजिल्हाप्रमुख राहुल भगत, शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, कल्याण शहरप्रमुख शरद पाटील, उपशहरप्रमुख शेखर यादव, शहर संघटक मीन माळवे, माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे तसेच प्रियंका विचारे, रिचा कामतेकर, शाम चौगले, चेतन म्हात्रे, राहुल चौधरी, राजेंद्र सावंत, श्याम पाटील, अर्जुन मोरया, परेश म्हात्रे, ज्ञानेश्वर मराठे आदी पदाधिकारी उपस्थित होते. आरोपी गोकुळ झा याच्यावर 307 कलमानुसार हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी दीपेश म्हात्रे यांनी केली. आरोपीला पकडायला पोलिसांना 22 तास लागले ही खेदाची गोष्ट असल्याचेही ते म्हणाले. राज्यात महिला, मुलींवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. पण गृहमंत्री आणि पोलीस प्रशासन सुस्त असल्याची टीका वैशाली दरेकर यांनी केली.