‘वन अबव्ह’, ‘मोजोस बिस्रोच्या मालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई होणार

सामना ऑनलाईन, मुंबई

लोअर परळ येथील कमला मिल अग्नितांडव प्रकरणाला या मिलचे मालक रमेश गोवानी यांच्यासह ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजोस बिस्त्रो’ या रेस्टॉरण्टचे मालक जबाबदार असून या तिघांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याची शिफारस या प्रकरणाची चौकशी करणाऱया न्यायमूर्ती अरविंद सावंत आयोगाने केली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती अरविंद सावंत, आर्किटेक्ट वसंत ठाकूर आणि मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त के. नलिनाक्षन यांचा  समावेश असलेल्या या चौकशी आयोगाने या घटनेला गोवानीसह रेस्टॉरण्टच्या मालकांवर ठपका ठेवला आहे.

गोवानी याच्याकडे कमला मिलचे 95 टक्के स्टेक असून त्यांनीच ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजोस बिस्त्रो’ या रेस्टॉरण्टस्ना टेरेसवर बेकायदेशीरपणे अतिरिक्त बांधकाम करण्याची मंजुरी दिली. तर ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजोस बिस्त्रो’ या दोन्ही रेस्टॉरण्टच्या मालकांनीदेखील नियमाचे उल्लंघन करत बेकायदा बांधकाम केले. तेथे ज्वलनशील वस्तूंचा साठा केला असेही आयोगाने अहवालात म्हटले आहे.