
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘गोल्डन डक’ची दुर्दैवी हॅटट्रिक करणारा झंझावाती फलंदाज सूर्यकुमार यादव आता सर्वांच्याच टीकेचा धनी झाला आहे. सूर्यकुमारच्या सातत्यपूर्ण अपयशानंतर त्याला ब्रेक देत संजू सॅमसनला खेळविण्याची मागणीही वाढत चाललीय, पण कर्णधार रोहित शर्मापाठोपाठ महान कर्णधार कपिलदेव हेसुद्धा सूर्यकुमारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यांनी टीकाकार आणि क्रिकेटप्रेमींना फटकारत सूर्या आणि संजूमध्ये तुलना करू नये असा सल्लाही दिला.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कपिल म्हणाले, सूर्यकुमार आता अपयशाच्या गर्तेत सापडला आहे. त्याला आपल्या कारकीर्दीला ट्रकवर आणण्यासाठी सहकार्याची गरज आहे. जो खेळाडू चांगला खेळतो त्याला नेहमीच जास्त संधी मिळते. अशी संधी सूर्यालाही मिळायला हवी. त्यामुळे सूर्या आणि संजू सॅमसनमध्ये कुणीही तुलना करू नये. हे योग्य नव्हे. जर संजू अशा वाईट काळातून जात असता तर तुम्ही अन्य कुणाशी त्याची तुलना केली असती का, असा सवालही त्यांनी टीकाकारांना केला. जर संघ व्यवस्थापनाने सूर्यकुमार यादवला पुन्हा घ्यायचा निर्णय घेतला असेल तर त्याला आणखी संधी मिळायला हवी. लोपं तर जरूर चर्चा करणार. आपले मत मांडणार, पण शेवटी निर्णय तर संघ व्यवस्थापनच घेणार.
तसेच कपिलदेव यांनी फलंदाजीतल्या क्रमात केलेला बदल सामान्य असल्याचे सांगितले. फलंदाजीच्या क्रमात बदल करणे नवे नाही. पण जेव्हा फलंदाजाचा आत्मविश्वास ढासळतो तेव्हा त्याला तळाला फलंदाजी करायला पाठविले जाते. मात्र तेव्हा खेळाडूने आपल्या कर्णधाराला आत्मविश्वासाने सांगायला हवे की, मी आघाडीलाच स्वतःला सांभाळू शकतो. प्रशिक्षक आणि कर्णधाराने काही विचार करूनच हा निर्णय घेतला असावा, असेही ते म्हणाले.
संजूवर अन्याय का?
के. एल. राहुल आणि सूर्यकुमारला स्वतःला सिद्ध करण्यासाठी वारंवार संधी देण्यात कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाला धन्यता वाटतेय, पण अशी संधी संघ व्यवस्थापनाने संजू सॅमसनसारख्या गुणवान खेळाडूला अद्याप दिलेली नाही. आगामी वर्ल्ड कपच्या संघात त्याला संधी मिळायला हवी, पण निवड समिती आणि संघ व्यवस्थापन संजूला संघापासून दूरच ठेवत असल्याचे दिसतेय. जुलै 2021 मध्ये वन डे संघात पदार्पण करणाऱया यष्टिरक्षक फलंदाजाला गेल्या दीड वर्षात केवळ 11 सामनेच खेळविण्यात आले आहेत. त्याने 66 धावांच्या सरासरीने 330 धावा केल्या आहेत. या 11 सामन्यातील 10 डावांत त्याने 46, 12, 54, ना. 6, ना. 43, 15, ना. 86, ना. 30, ना. 2, 36 अशा खेळ्या केल्या आहेत. असे असूनही संजूवर नेहमीच अन्याय केला जातोय आणि त्याला सापत्न वागणूक दिली जातेय हे वारंवार दिसून आलेय.