
कराड कराड, दि. 13 (सा. वा.) येथील यशवंत बँकेत 112 कोटी 10 लाख 57 हजार 481 रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह 50 जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत झालेल्या लेखापरीक्षण व 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2024 अशा लेखापरीक्षण पूर्व कालावधीत कार्यरत असलेल्यांवर अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी पुण्याचे शासकीय सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी फिर्याद दिली आहे.
सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह त्या कालावधीतील संचालक नरेंद्र भोईटे, रवींद्र टोणपे, चंद्रकांत चव्हाण, अनिल चव्हाण, सुनील पावसकर, सुधीर कुलकर्णी, श्रीकृष्ण जोशी, अवधूत नाटेकर, डॉ. नचिकेत वाचासुंदर, चंद्रकांत कुलकर्णी, गणपतराव निकम, नानासो पवार, पांडुरंग करपे, नितीन रेडेकर, स्नेहन कुलकणीं, कल्पना गुणे, लक्ष्मण सपाटे, महेशकुमार जाधव, अजित निकम, नानासाहेब पवार, गोपीनाथ कुलकर्णी, संदीप इंगळे, जयवंत जगदाळे, डॉ. प्रदीपकुमार शिंदे, प्रसाद देशपांडे, सुहास हिरेमठ, परशुराम जंगाणी,अनघा कुलकर्णी, विशाल शेजवळ, प्रमोद गिजरे, वसंतराव बोराटे, सुनील मुंद्रावळे, नीलिमा कुलकर्णी, रेखा कुलकर्णी, सचिन साळुंखे, बँकेचे तत्कालीन सीईओ संतोष देसाई, धनंजय डोईफोडे, वैशाली मोकाशी, शाखा व्यवस्थापक वैशाली पावशे, केशव कुलकर्णी, चरेगावकर यांचे भाऊ शार्दूल ऊर्फ मुकुंद चरेगावकर, विठ्ठल ऊर्फ शौनक कुलकर्णी, राही कुलकर्णी, संहिता कुलकर्णी, वैभव कुलकर्णी, काशिनाथ कुलकर्णी, सूरज गायधनी, विभिषण सोनावणे, दिनेश नवळे
यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
यशवंत बँकेचे अध्यक्ष, कर्मचारी व संचालकांनी 9 ऑगस्ट 2014 ते 31 मार्च 2025 यादरम्यान स्वतःच्या लाभासाठी बँकेचे आर्थिक नुकसान केले. परस्पर संगनमताने 112 कोटी 10 लाख 57हजार 481 एवढ्या रकमेचा अपहार केला. त्यासाठी बोगस कर्ज प्रकरणांसाठी खोटी व बनावट कागदपत्रे तयार केली. कर्जास तारण न घेता हेतुपुरस्सर कर्ज वितरण करून जुनी थकीत खाती बंद दाखवून नवीन खाती उघडली. त्याद्वारे निधीचा उद्देशबाह्य विनियोग करून तृतीय पक्षांकडे निधी वळविला, तसेच दस्तऐवजांत फेरफार व खोट्या नोंदी तयार करून बँकेच्या निधीचा गैरविनियोग करून अपहार केल्याचे शासकीय सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
भाजपवाल्यांचा भ्रष्टाचार
शेखर चरेगावकर हा भारतीय जनता पार्टीने नियुक्त केलेला सहकार परिषदेचा अध्यक्ष होता. भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून यापूर्वी कार्यरत होता. दरम्यान, बहुतांश संचालक हे भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आणि आरएसएसचे स्वयंसेवक आहेत.
195 बोगस कर्ज खाती
यशवंत बँकेचे तत्कालीन अध्यक्ष चरेगावकरसह 36 संचालक, तीन कार्यकारी अधिकारी, दोन व्यवस्थापक व चरेगावकरांच्या नातेवाईकांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. संबंधितांनी त्यांची कर्तव्ये पार न पाडता, पदाचा गैरवापर करून बँकेच्या ठेवीदार व सभासदांच्या हितास बाधा निर्माण केली आहे. त्यांनी संगनमताने अपहार केला असून, त्यात 195 बोगस कर्ज खाती असल्याचेही सन्दी लेखापाल मंदार देशपांडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.