कर्जतच्या कशेळे रुग्णालयातील एक्स-रे सेवा महिनाभर ठप्प, रुग्णांची खासगी दवाखान्यांमध्ये फरफट

कर्जत तालुक्यातील कशेळे ग्रामीण रुग्णालय सोयीसुविधांअभावी व्हेंटिलेटरवर गेले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गेल्या महिन्यापासून रुग्णालयातील एक्स-रे मशीन बंद आहे. एक्स-रे सेवा ठप्प असल्यामुळे रुग्णांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. गोरगरीब रुग्णांची खासगी दवाखान्यांमध्ये फरफट होत असून त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

उपचारासाठी कशेळे ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना एक्स-रे आवश्यक असल्यास थेट १९ किलोमीटर दूर असलेल्या कर्जत रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. कर्जतला जायचे म्हटल्यास गरीबांना बसभाडे, वेळ आणि दिवसभराची मजुरी असा तिहेरी फटका बसत आहे. दोन दिवसांपूर्वी निर्मला पादिर या महिला रुग्णालयात उपचारासाठी आल्या. येथील एक्स-रे मशीन बंद असल्याने डॉक्टरांनी त्यांना खासगी टेक्निशियनकडे पाठवले. पैसेच नसल्याने खासगी सेंटरला न जाता उपचाराविना त्यांना घरी जावे लागले. रुग्णालयातील महत्त्वाची सेवा महिनाभर बंद असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. मशीन दुरुस्तीसाठी कोणतेही गांभीर्य दाखवले जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. रुग्णांची गैरसोय होत असतानाही प्रशासन मौन बाळगून आहे. ग्रामीण भागातील आदिवासींची आरोग्यासारख्या मूलभूत सेवेअभावी हेळसांड होत आहे.

कंपनी लक्षच देत नाही

कशेळे ग्रामीण रुग्णालयातील प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत ठोंबरे यांनी सांगितले की गेल्या महिनाभरापासून एक्स-रे मशीन बंद असून याबाबत संबंधित कंपनीला पत्रव्यवहार, मेलद्वारे कळवले आहे, परंतु एकाही मेलला उत्तर नाही. वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नाही