कर्जतच्या खांडस, कोल्हारेत भीषण टंचाई; टँकरमाफियांकडून लुटमार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्जत तालुक्यात – ग्रामपंचायतींकडून पाणीपुरवठ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वीज बिलांची थकबाकी वाढल्याने महावितरणने थेट वीजच कापून टाकली आहे. त्याचा मोठा फटका गावकऱ्यांना बसला असून खांडस आणि – कोल्हारे गावाला पाणीटंचाईचे भीषण चटके बसत आहेत. या आणीबाणीचा फायदा टँकरमाफियांनी उचलला असून त्यांच्याकडून गावकऱ्यांची बेसुमार लूट सुरू आहे.

खांडस ग्रामपंचायतीचे सुमारे २ लाख रुपयांचे वीज बिल थकले आहे. त्यामुळे महावितरणने नोटीस दिली. मात्र त्यानंतरही बिल भरले गेले नसल्याने थेट वीजपुरवठाच खंडित करण्यात आला. त्यामुळे गावात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हारे ग्रामपंचायतीचे ३ लाख ४५ हजार रुपयांचे वीज – बिल थकले. या गावचीही वीज कापण्यात आली. त्यामुळे कोल्हारे, धामोते, हजारेनगर परिसरात गेल्या १० दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांना टँकरवर अवलंबून राहावे
लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी २०० लिटरच्या पिंपामागे १०० रुपये तर इतर वापरासाठी ५० रुपये मोजावे लागत आहेत. या पाणीटंचाईचा फायदा टँकरमालकांनी उचलला असून वाढीव दराने पाणी विकले जात आहे.

ग्रामीण रुग्णालयालाही टँकरचा आधार

कर्जतच्या ग्रामीण रुग्णालयालाही या पाणीबाणीचा फटका बसला आहे. अखेर ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर ग्रामीण रुग्णालयाला टँकरद्वारे पाणी पुरवण्यात आले.

गावात पाणीपट्टी

भरण्यासाठी मोहीम आखण्यात आली होती. परंतु पुरेशी पाणीपट्टी वसूल न झाल्याने वीज बिल भरणे शक्य झाले नाही. मात्र दोन दिवसांपूर्वी आम्ही थकबाकी भरली आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती ग्रामसेवक बाळकृष्ण मोरे यांनी दिली. – बाळकृष्ण मोरे, ग्रामसेवक, खांडस