पावसाने डायव्हर्शन फुटला; आता पूल फुटण्याच्या मार्गावर, फिसरे-गौंडरे रस्त्याचे काम रखडले

karmala Fisre-Goundre road issue

करमाळा तालुक्यातील फिसरे-हिसरे- गौंडरे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजने’तून 8 कोटी 86 लाख मंजूर झाल्यानंतर फिसरे ते गौंडरे रस्ता उघडून खडीकरण करण्यात आले. मात्र, काम सुरू होऊन सहा महिने झाले तरी रस्ता व पुलाचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

फिसरे ते गौंडरे रस्त्यावर सुरू असलेल्या पुलाचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने धोका निर्माण झाला आहे. बाजूने वाहने जाण्यासाठी केलेला डायव्हर्शन रस्ता पावसाने फुटला असून, उखडून ठेवलेला अर्धवट अवस्थेत असलेला पूलदेखील फुटण्याच्या मार्गावर आहे.

या पुलाची उंची कमी असल्याने आजपर्यंत अनेकवेळा एक रात्र रात्र वाहतूक बंद पडल्याने विद्यार्थी, शिक्षक गुरं-ढोरं अडकून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. हिसरे येथील युवकांनी प्रसंगावधान राखून दोऱया टाकल्याने धाडस करून दुचाकीवरील दोन पैलवानांना वाचवले होते. स्थानिक नागरिक व युवासेनेकडून अनेकवेळा आंदोलन केल्यानंतर सदर रस्ता व पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. मात्र, ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

प्रशासन, ठेकेदार यांच्यात मिलीभगत

एक वर्षात या रस्त्याचे काम करण्याची मुदत असताना आठ महिन्यांपासून दहा टक्केदेखील काम शांभवी कन्स्ट्रक्शन कंपनीकडून झालेले नाही. रॉयल्टी न भरता अवैध खडीक्रशर चालवून हजारो ब्रास खडी क्रश केली आहे. तसेच मुरुम चोरी केली असून, प्रशासन व ठेकेदार यांच्यात मिलीभगत असल्याने कंपनीस पाठीशी घातले जात आहे. – शंभुराजे फरतडे, युवासेना तालुकाप्रमुख