
कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकार आज (21 नोव्हेंबर) रोजी अडीच वर्ष पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर कर्नाटकात प्रदेशाध्यक्षांसह मुख्यमंत्रीही बदलणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. अशातच उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या गटातील काही आमदार दिल्लीला रवाना झाले आहेत. अडीच वर्षानंतर नेतृत्व बदलाचे वचन पूर्ण करण्याची मागणी घेऊन हे आमदार काँग्रेस हायकमांडकडे जाणार असून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचीही भेट घेणार आहेत.
डीके शिवकुमार गटाचे मंत्री आणि आमदार असे 10 हून अधिक नेते गुरुवारी दिल्लीत पोहोचले असून शुक्रवारीही आणखी काही आमदार राजधानीत दाखल होण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये ठरलेल्या सत्तावाटप व्यवस्थेची अंमलबजावणी करण्याची मागणी लावून धरत या आमदारांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सरचिटणीस केली वेणुगोपाल यांची भेट घेण्याची योजना आखली आहे.
दरम्यान, सिद्धरामय्या यांनी शुक्रवार आणि शनिवारचा म्हैसूर व चामराजनगरचा दोन दिवसीय दौरा अचानक रद्द करत तातडीने बंगळुरूकडे धाव घेतली आहे. त्यामुळे कर्नाटक काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
दिल्लीत कोण दाखल?
गुरुवारी काँग्रेसचे काही मंत्री आणि आमदार दिल्लीत दाखल झाले असून शुक्रवारीही काही आमदार दिल्ली गाठण्याची शक्यता आहे. गुरुवारी दिल्लीत पोहोचलेल्या आमदारांमध्ये दिनेश गुलैगौडा, रवि गनीगा, गुब्बी वासू यांचा समावेश आहे. तर शुक्रवारी अनेकल शिवन्ना, नेलमंगला श्रीनिवास, इक्बाल हुसेन, कुनिगल रंगनाथ, शिवगंगा बसवराजू आणि बालकृष्ण हे आमदार दिल्लीत पोहोचतील. तसेच शनिवारी आणि रविवारीही आणखी काही आमदार दिल्लीत पोहोचण्याची शक्यता आहे. सिद्धरामय्या सरकारने अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यावर आता नेतृत्व बदल करत डी. के. शिवकुमार यांच्याकडे राज्याची सूत्र देण्यात यावी अशी मागणी आमदारांनी लावून धरली आहे.
शिवकुमार यांचे सूचक विधान
दरम्यान, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतिनिमित्त बंगळुरुत आयोजित एका कार्यक्रमात डी. के. शिवकुमार यांनी एक सूचक विधान केले होते. मी या पदावर कायम राहू शकत नाही. साडेचार वर्ष झाली असून मार्चमध्ये सहा वर्ष पूर्ण होतील. आता इतर नेत्यांनाही संधी दिली पाहिजे, असे ते म्हणाले होते.




























































