
माजी मंत्री व अजितदादा गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. पत्नी धनंजय मुंडे यांच्याकडून धमक्या तसेच ‘एआय’च्या माध्यमातून छळ सुरू असल्याची लेखी तक्रार करुणाऱ्यांनी न्यायालयात केली आहे. वांद्रे न्यायालयाने या तक्रारीची दखल घेत उत्तर सादर करण्याचे आदेश धनंजय मुंडे यांना दिले आहेत.
धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा यांना कुठलाही त्रास देऊ नये असे न्यायालयाने आदेश देऊनही पती धनंजय मुंडे व त्यांच्या माणसांकडून दररोज जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार करत करुणा मुंडे यांनी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. धमक्यांसोबतच मोबाईलवर आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अश्लील व्हिडीओ पाठवले जात असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. ज्या व्हिडीओत आणि फोटोत आपण नसतानाही एआयच्या माध्यमातून आपण असल्याचे भासवत छळ केला जात असल्याचे त्यात नमूद केले आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयात आज शनिवारी या अर्जावर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने याप्रकरणी धनंजय मुंडे यांना उत्तर सादर करण्याचे आदेश देत सुनावणी 6 जून रोजी ठेवली.
60 लाख पोटगी वसूल करा
करुणा मुंडे यांनी अॅड. चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत न्यायालयात तीन अर्ज सादर केले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार दरमहा 2 लाख रुपये याप्रमाणे 2022 सालापासून आजपर्यंत 60 लाख रुपये पोटगी धनंजय मुंडेंकडून मिळणे अपेक्षित होते; मात्र ही पोटगी न मिळाल्याने धनंजय मुंडेंकडून ही पोटगी न्यायालयाने वसूल करावी अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे आपल्या नावावर असलेल्या मालमत्तांची विक्री करण्यापासून धनंजय मुंडेंना रोखावे असेही अर्जात म्हटले आहे.