सध्या देशात सण उत्सवाचे वातावरण असून रविवारी करवा चौथचा सण साजरा केला जाणार आहे. या सणाचे देशाच्या संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. मुख्यत: विवाहित महिलांसाठी हा सर्वात महत्त्वाचा आणि खास सण आहे. गेल्या काही वर्षांपासून करवा चौथची क्रेझ वाढत आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात. यंदा या निमित्ताने दिल्लीसह अनेक शहरातील बाजारपेठांमध्ये सुमारे 22 हजार कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी हा आकडा 15 हजार कोटींहून अधिक होता.
गेल्या दोन दिवसांपासून देशातील बाजारपेठांमध्ये करना चौथ या सणाच्या खरेदीसाठी उत्साहाचे वातावरण आहे. कपडे, दागिने, मेकअप-प्रोडक्ट, भेटवस्तू आणि पुजेच्या वस्तूंपासून बऱ्याच गोष्टींना बाजारात उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे देशभरात सुमारे 22 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तर फक्त दिल्लीतच जवळपास 4 हजार कोटी रुपयांची विक्री होणार आहे.
करवा चौथच्या दिवशी महिला आपल्या पतीसाठी साज श्रृंगार करतात. या दिवशी मेहंदी लावणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे आजच्या दिवशी मेहंदीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे करवा चौथचा हा सण उत्तम व्यवसायासाठी मोठी संधी आहे. हिंदुस्थानी परंपरेनुसार नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या लग्नसोहळ्यांसाठी सोन्याच्या दागिन्यांचे बुकिंग करवा चौथपासून सुरू होते.