वैदिक मंत्रांच्या जयघोषाने केदारनाथ धामचे दरवाजे उघडले; हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव

देवभूमी उत्तराखंडमधील केदारनाथ धामचे दरवाजे शुक्रवारी सकाळी 7 वाजता विधिवत वैदिक मंत्रांच्या जयघोषाने भाविकांसाठी उघडण्यात आले. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थित होते. पुजाऱ्यांनी वैदिक मंत्रांनी विधीवत अर्चना करत ‘हर-हर महादेव’ अशा भाविकांनी केलेल्या जयघोषाच मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळी हेलिकॉप्टरमधून भाविकांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला.

बाबा केदारनाथ यांची पंचमुखी चाल विग्रह उत्सव डोली गुरुवारी केदारनाथ धाममध्ये पोहोचली होती. सुमारे 15 हजारांहून अधिक भाविक बाबांच्या दर्शनासाठी आधीच पोहोचले होते. यानिमित्ताने बाबा केदारनाथ यांचे मंदिर 108 क्विंटल फुलांनी भव्यपणे सजवण्यात आले होते. यावेळी केदारनाथ यात्रेत गर्दी नियंत्रणासाठी टोकन प्रणाली लागू केली जात आहे, जी पहिल्या दिवसापासून लागू होईल. टोकन काउंटरची संख्या वाढवण्याचे, पीए सिस्टीमद्वारे प्रवाशांना माहिती देण्याचे आणि स्क्रीनवर स्लॉट आणि नंबर प्रदर्शित करण्याचे निर्देश डीजीपींनी दिले.

केदारनाथमधील प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. केदारनाथ मंदिर संकुलाच्या 30 मीटरच्या आत मोबाईल फोन वापरण्यास मनाई आहे. रील किंवा फोटोशूट करताना आढळल्यास मोबाईल फोन जप्त केला जाईल आणि 5000 रुपये दंड भरावा लागू शकतो. दरवर्षी हिवाळ्यात, मुसळधार बर्फवृष्टीमुळे बाबा केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. उन्हाळा येताच, मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडतात आणि बाबा केदारनाथ भक्तांना दर्शन देतात.