Kedarnath Yatra – केदारनाथ मार्गावर भूस्खलन, यात्रा स्थगित; एसडीआरएफकडून 100 यात्रेकरूंची सुटका

केदारनाथ यात्रा मार्गावर सोनप्रयागजवळ भूस्खलन झाले. भूस्खलनामुळे हा मार्ग अंशतः बंद झाल्याने गौरीकुंड येथे केदारनाथ यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. भूस्खलनाची माहिती मिळताच उपनिरीक्षक आशिष डिमरी यांच्या नेतृत्वाखाली एसडीआरएफ सोनप्रयागची एक टीम तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आली. घटनास्थळी व्यापक बचाव कार्य सुरू आहे.

रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान एसडीआरएफच्या पथकाने यात्रा मार्गावर अडकलेल्या सुमारे 100 यात्रेकरूंना सुरक्षितपणे बाहेर काढले. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग बाधित यात्रेकरूंसाठी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्याचे प्रयत्न करत आहेत.

हवामान विभागाने देहरादून, चंपावत आणि नैनिताल जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वीज पडण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय, उधम सिंह नगर जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वीज पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच नागरिकांना नद्या आणि ओढ्यांपासून दूर रहा, भूस्खलनाचा धोका लक्षात घेता डोंगराळ भागात जाऊ नये, असे आवाहन केले आहे.