सुनेत्रा पवारांच्या शपविधीपासून पार्थ पवारांना दूर ठेवा, भाजपचा संदेश! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद रिक्त झालं होतं. यातच आज राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी आज शपथ घेतली. मात्र या शपथविधी सोहळ्याला अजित पवार यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार अनुपस्थित होते. यावरूनच आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या शपथविधी सोहळ्यात पार्थ पवार यांनी उपस्थित राहू नये, असा स्पष्ट संदेश भारतीय जनता पक्षाकडून अजित पवार गटाला देण्यात आला होता, अशी चर्चा आहे.

पार्थ पवार यांची पुण्यातील भूखंड प्रकरणी चौकशी सुरू असून यासंबंधित समितीचा अहवाल देखील समोर आला आहे. याच प्रकरणामुळे पार्थ पवार कार्यक्रमात उपस्थित राहिल्यास भाजपच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामुळेच पार्थ पवार या कार्यक्रमात उपस्थित नव्हते, अशी चर्चा सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

दरम्यान, असा आरोप आहे की, पार्थ पवार यांच्या मालकीच्या अमेडिया कंपनीने महार वतनाची जमीन खरेदी केली. महार वतनाच्या जमिनीचा कायद्यानुसार व्यवहार करता येत नाही. वतनधारकाला जमीन विकली गेल्यास त्या किमतीचा काही भाग सरकारला नजराण्याच्या स्वरूपात द्यावा लागतो. मात्र, या व्यवहारातील कागदपत्रांमध्ये असा कोणताही उल्लेख नसल्याचे बोलले जातेय. कागदोपत्री हा व्यवहार पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर या शीतल तेजवानी यांच्या कंपनीसोबत झाला असल्याचे भासवले असले, तरी प्रत्यक्षात अमेडिया कंपनीने मूळ गायकवाड आणि २७४ जमीनमालकांसोबत खरेदी खत नोंदवले असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणातील आर्थिक देवाणघेवाण, चेक, एनईएफटी व्यवहार किंवा बँक पुरावे हे नोंदणी दस्तावेजात जोडले गेले नाहीत, यावरून या व्यवहारातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलीस तपास अद्यापही सुरू आहे.