
उन्हाळा आल्यावर घामाद्वारे शरीरातील पाणी कमी होते. तसेच शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी आपण अनेक ड्रींक पितो, मात्र दिवसाची सुरुवात करण्यासाठी प्रथिनेयुक्त स्मूदी हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि आपण बाहेरचं खाणे टाळतो. आणखी एक फायदा म्हणजे स्मूदी बनवण्यास फक्त काही मिनिटे लागतात. तसेच स्मूदीमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात कारण त्यामध्ये फळे, दही, बिया आणि काजू यांचे मिश्रण असते. ज्यामुळे शरीरात ऊर्जा प्रदान करते आणि जास्त काळ पोट भरलेले ठेवते. उन्हाळ्यात आहारामध्ये निरोगी, प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणे महत्वाचे आहे. तर, चला जाणून घेऊ वेगवेगळ्या प्रकारच्या निरोगी स्मूदींची रेसिपी. ज्या तुम्ही सहज घरी बनवू शकतात.
स्ट्रॉबेरी-चिया स्मूदी

सकाळी तुम्ही चिया बिया आणि स्ट्रॉबेरी वापरून स्मूदी बनवू शकता. स्ट्रॉबेरी-चिया स्मूदी बनवण्यासाठी २ चमचे चिया सिड्स वाटीभर दुधात भिजवा आणि 10-15 मिनिटे ठेवा. ब्लेंडरमध्ये स्ट्रॉबेरी, बदामाचे दूध किंवा थोडे दही घाला त्यानंतर चिया सिडेस घाला आणि मिक्सर मधून फिरवून घ्या. ही क्रिमी स्मूदी प्रथिने, फायबर आणि निरोगी चरबीने समृद्ध आहे. तुम्हाला हवे असल्यास गोडव्यासाठी त्यामध्ये तुम्ही 1 चमचा मध घालू शकता.
पालक, पीनट बटर ,केळी स्मूदी

पीनट बटर आणि केळी यांचे मिश्रण एक उत्तम स्मूदी बनवते. त्यात थोडा पालक आणि थोडा केफीर घाला. सर्वकाही एकत्र करून स्मूदी बनवा. अगदी सोपी आणि चवदार स्मूदी तयार आहे.
जवसाच्या बियांची स्मूदी

व्यायामानंतर, तुम्ही सकाळी जवस स्मूदी पिऊ शकता. यामुळे तुम्हाला भरपूर पोषक तत्वे आणि भरपूर प्रथिने मिळतील. ते बनवण्यासाठी मिक्सरमध्ये जवस बिया 1 केळी किंवा तुमच्या आवडीचे इतर कोणतेही फळ, 1 चमचा पीनट बटर आणि 1/2 कप दही किंवा सोया मिल्क घाला आणि सर्वकाही एकत्र करुन टेस्टी स्मूदीचा आस्वाद घ्या.
मिक्स बेरीज स्मूदी

जर तुम्हाला मल्टी-व्हिटॅमिन, प्रथिनेयुक्त स्मूदी बनवायची असेल तर मिक्स्ड बेरी वापरून म्हणजेच ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि रासबेरी वापरा आणि ग्रीक दही किंवा सोया मिल्क घाला. अतिरिक्त फायबरसाठी चिया सिड्स देखील घालता येतात. सर्व घटक एकत्र करून मिक्सर मधून फिरवून घ्या. अशा प्रकारे, तुमची प्रथिनेयुक्त स्मूदी तयार होईल.
चॉकलेट-स्ट्रॉबेरी प्रोटीन स्मूदी

जर तुम्ही चॉकलेट प्रेमी असाल आणि त्यामध्ये तुम्हाला काही निरोगी हवे असेल तर हे चॉकलेट स्मूदी नक्की बनवून बघा. सोया मिल्क, थोडे दही, स्ट्रॉबेरी, केळी आणि कोको पावडर घालून मिक्सरला फिरवून घ्या यामध्ये तुम्हाला साखरेचीही गरज लागत नाही.



























































