
रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पदरीत्या फिरणारे गर्दुल्ले, मद्यपी लोकांवर आरपीएफने करडी नजर रोखली आहे. अशा लोकांकडून रेल्वे वाहतुकीसह प्रवाशांच्या सुरक्षेला धोका पोहोचू शकतो, या पार्श्वभूमीवर आरपीएफ ‘अॅक्शन मोड’वर आली आहे. दिवसभरातून दोनदा गस्त घालण्याबरोबरच आरपीएफचे जवान मध्यरात्रीही वॉच ठेवत आहेत.
आठवडाभरापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रेल्वे रुळावर एक मद्यपी व्यक्ती झोपला होता. त्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आरपीएफने रेल्वे स्थानक परिसरात फिरणारे भिकारी, गर्दुल्ले आणि मद्यपींना हटवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आरपीएफचे जवान सकाळी आणि सायंकाळी अशा दोन वेळेला रेल्वे स्थानक परिसरातील गर्दुल्ले, मद्यपी व इतर समाजपंटकांना रोखण्यासाठी गस्त घालत आहेत. सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत तसेच सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत स्थानक परिसरातील गर्दुल्ले व मद्यपींना हटवण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये वांद्रे टर्मिनसवर एका 54 वर्षीय महिलेवर अत्याचाराची घृणास्पद घटना घडली होती. तशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये या अनुषंगाने आमचे जवान संपूर्ण रात्रभर रेल्वे स्थानक परिसरात जागता पहारा देतात, असे पश्चिम रेल्वे मार्गावरील आरपीएफच्या अधिकाऱयाने सांगितले.





















































