केईएममध्ये हेलिकॉप्टरमधून आणणार अवयव, आयुष्यमान टॉवरवर हेलिपॅड उभारण्यास मुंबई महापालिकेची मंजुरी

केईएम रुग्णालयाच्या आसपासचा परिसर आणि मुंबईतील वाहतूककोंडी यामुळे रुग्णालयात अवयव प्रत्यारोपणासाठी अवयव पोहोचवताना ग्रीन कॉरीडॉर देऊनही वेळेवर पोहोचता येत नाही. मात्र, आता अवयव प्रत्यारोपणासाठी रुग्णाला फार काळ वाट पाहावी लागणार नाही. कारण, भविष्यात रुग्णालयात हेलिकॉप्टरमधून अवयव आणता येणार आहेत. त्यासाठी प्रस्तावित 45 मजली आयुष्यमान शताब्दी टॉवरवर हेलिपॅड उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला मुंबई महापालिका आयुक्तांनी गेल्याच आठवडय़ात मंजुरी दिली असून आता हा प्रस्ताव महापालिकेच्या आर्किटेक्टकडे पाठवण्यात आल्याची माहिती केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दिली. याला महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दुजोरा दिला आहे.

रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी जानेवारी महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केईएममध्ये आयुष्यमान शताब्दी टॉवर उभारण्यासाठी मंजुरी दिली होती. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे पाठवला होता. या प्रस्तावाला त्यांनी गेल्याच आठवडय़ात मंजुरी दिली. केईएमला 100 वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्ताने रुग्णालय भविष्यात आणखी प्रशस्त आणि अद्ययावत सोयीसुविधांनी सुसज्ज व्हावे यासाठी आयुष्यमान शताब्दी टॉवर बांधण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असल्याचे
डॉ. संगीता रावत म्हणाल्या.

वर्षाला 70 हजारांहून अधिक शस्त्रक्रिया

रुग्णालयात वर्षाला तब्बल 70 हजारांहून अधिक शस्त्रक्रिया केल्या जातात. तसेच किडनी, यकृत आणि हृदय प्रत्यारोपण, 700 हून अधिक एपिलेप्सी, तर 600 हून अधिक कॉक्लीयर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या आहेत.

सोनोग्राफी, एमआरआय स्पॅन, स्वतंत्र लॅब

रुग्णांना एकाच ठिकाणी सोनोग्राफी, एक्सरे, एमआरआय स्पॅन अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. स्वतंत्र लॅब या ठिकाणी उभारण्यात येईल. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव होणार नाही. नवीन इमारतीत सोनोग्राफी मशीन, सीटी स्पॅन, एमआरआय स्पॅन मशीनची संख्या वाढवता येईल, असे ऑर्थोपेडिक स्पोर्टस् इन्ज्युरी सर्जन डॉ. रोशन वाडे यांनी सांगितले.

सेंट्रलाईज्ड आयसीयू, निर्जंतुकीकरण विभाग एकाच ठिकाणी

नव्या इमारतीत सेंट्रलाईज्ड म्हणजेच केंद्रीकृत अतिदक्षता आणि निर्जंतुकीकरण आणि शस्त्रक्रिया विभाग असेल. त्यासाठी मजल्यांची विभागणी करण्यात येईल, जेणेकरून डॉक्टरांना एकाच ठिकाणी रुग्णांची तपासणी करता येईल. डॉक्टरांना एका इमारतीतून दुसऱया इमारतीत धावाधाव करावी लागणार नाही. तसेच अतिरिक्त मनुष्यबळाचीही गरज भासणार नाही, अशी माहिती डॉ. रावत यांनी दिली.