
सामना ऑनलाईन, तिरुवनंतपुरम
पाऊस बंद झाल्यामुळे महापूर ओसरू लागलेल्या केरळमध्ये आता लोकांचा जगण्याचा भयंकर संघर्ष सुरू झाला आहे. लाखो लोकांची घरे कोसळली, दुकाने, गोडाऊनमधील धान्यसाठा संपला, पै-पै जमा करून घरात घेतलेल्या वस्तू वाहून गेल्या, साठवलेली पुंजी गेली, आता जगायचे कसे, असा प्रश्न जनतेपुढे पडला आहे.
एक लिटर पेट्रोल-डिझेल मिळविण्यासाठी आठ-दहा तास रांगेत उभे राहावे लागत आहे. रोगराईचे संकट उभे राहिले आहे. दरम्यान, केरळमधील महापुराला राष्ट्रीय आपत्ती घोषित करता येणार नाही, असे केंद्र सरकारने हायकोर्टात सांगतानाच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केरळमधील स्थिती ही गंभीर नैसर्गिक आपत्ती असल्याचे घोषित केले आहे.
पाऊस बंद झाल्यामुळे नद्यांना आलेला पूर ओसरू लागला. 80 धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्गही कमी झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने 14 जिह्यांत दिलेला रेड ऍलर्टचा इशारा मागे घेतला आहे. त्यामुळे देश-विदेशातून मदतीचा ओघ वाढला आहे. कोची विमानतळ पुन्हा अंशतः सुरू करण्यात आला आहे.
भयंकर हानी
महापुराने केरळला पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. जीवितहानीबरोबरच खासगी आणि सरकारी मालमत्तेची प्रचंड हानी झाली. 357 लोकांचा बळी पुराने घेतला आहे. 8 ऑगस्टपासून 216 जणांचा मृत्यू झाला आहे. 7 लाख 24 हजार लोकांनी 5645 छावण्यांमध्ये आसरा घेतला आहे. लाखो घरे जमीनदोस्त झाली. शहरांपेक्षा ग्रामीण भागात घरांची जास्त हानी झाली. अन्नाची बंद पाकिटे, बाटलीबंद पाण्याची मदत सुरू असली तरी काही ठिकाणी ही मदत पोहचण्यास अडथळे येत आहेत. लष्कर, हवाई दल, नौदल आणि एनडीआरएफचे जवान दिवस-रात्र मदतकार्यात गुंतले आहेत. 33 हजारांवर लोकांची सुटका बहाद्दर जवानांनी केली आहे. रेल्वे रूळ उखडले आहेत. हजारो कि.मी.चे रस्ते वाहून गेले. वीजपुरवठा अनेक भागांत खंडित आहे.
थँक यू सर…
महाप्रलयात सापडलेल्या केरळ राज्यात लोकांचे प्राण वाचविण्यासाठी लष्कराचे जवान अहोरात्र जिवाचे रान करत आहेत. त्यात गेल्या शुक्रवारी कोची येथे कमांडर विजय वर्मा यांनी एका घराच्या छतावरच चॉपर उतरवले आणि दोन महिलांना जीवदान दिले. त्याबद्दल जवानांना धन्यवाद देत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘त्या’ घराच्या छतावरच आता ‘थँक्स’ हा शब्द रंगवला आहे.
मदतीचा ओघ सुरू
- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशही मदत देणार असल्याचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सांगितले.
- उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी राज्यसभेच्या अधिकाऱयांची बैठक घेतली.
- छत्तीसगडचे पोलीस अधिकारी एक दिवसाचे वेतन देणार.
- आसाम सरकारकडून 3 कोटींची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केली.
- खाद्यपदार्थांची 100 टनांची पाकिटे जालंधरहून पाठवण्यात आली.
- हैदराबादहून 50 आरओ प्लांट, 7 टन दूध पावडर पाठवण्यात आली.
- मुंबईहून 28 टन खाद्यपदार्थ, म्हैसूरहून 4 टन खाद्यपदार्थांची पाकिटे पाठवण्यात आली.
- पूरग्रस्त केरळवासीयांना मदतीसाठी मॅनेजमेंट गुरू म्हणून ओळखले जाणारे मुंबईचे डबेवालेदेखील सरसावले आहेत.
- पेपर ऍण्ड पार्सल आणि डबेवाला रोटी बँक यांच्या सहकार्याने 21 ऑगस्टला मुंबईहून केरळवासीयांसाठी खाद्यपदार्थ आणि प्रथमोपचार पेटी पाठवण्यात येणार आहे.





















































