केतकी चितळेचा जामीन मंजूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात तिला बुधवारी ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला. नवी मुंबई येथे दाखल अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात तिला यापूर्वीच जामीन मिळालेला आहे. त्यामुळे केतकीची कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तिला 14 मे रोजी अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात तिला न्यायालयीन कोठडी न्यायालयाकडून सुनावण्यात आली. दरम्यान केतकीने कळवा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी जामीन मिळवण्यासाठी वकिलामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जावर सुनावणी होताच आज न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला. 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

तुरुंगातून आज होणार सुटका

केतकीला जामीन मंजूर झाला असला तरी आजची रात्र तिला ठाणे कारागृहातच काढावी लागणार आहे. गुरुवारी सकाळी ठाणे कारागृहातून तिची सुटका होणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.