खरिपासोबत रब्बीचाही हंगाम वाया जाणार!

35

सामना प्रतिनिधी । सावळदबारा

पावसाअभावी खरिपाचा हंगाम हातातून गेला असताना आता रब्बी हंगाम सुद्धा जाणार आहे. कारण पाऊस जोरदार न झाल्याने पिकांची पेरणी होणार नाही. अशा स्थितीत दिवाळीचा सण कसा साजरा करायचा, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

सोयगावसह सावळदबारा परिसरात पावसाळ्यात सुरुवातीला वेळेवर पाऊस झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली; परंतु पुढील दिवसांत पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा दुबार पेरणी करावी लागली होती. पिके जोमात असतानाच पाऊस पडलाच नाही. ऐन दाणे भरताना पावसाची उघडीप झाल्याने पिके वाळून गेली. खरिपाच्या वेळी शेतकऱ्यांनी उसनवारी व कर्ज काढून पेरणी केली. शेतात माल न झाल्याने कर्ज कसे फेडावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. पाऊस न पडल्याने सोयगावसह सावळदबारा परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता दिवाळीसारखा मोठा सण कसा साजरा करायचा हा प्रश्न असून, शेतकऱ्यांकडे पैसे नाही दुसरीकडे डोक्यावर कर्ज. दोन वेचणीस कापूस संपला आहे. कपाशीवर केलेला खर्चसुद्धा निघणार नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, सोयगावसह सावळदबारा, डाभा नादाताडा, घाणेगाव, मोलखेडा, रवळा, जवळा, पिंपळवाडी, पळसखेडा, महालब्धा, देव्हारी, टिटवी,नादाताडा, मूर्ती, हिवरी या परिसरात खरीप व रब्बी हे हंगाम वाया जाणार आहेत.

शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. परंतु पाऊस न झाल्याने पिकांची वाढ खुंटली होती. रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांची पेरणी करण्यासाठी जमिनीत ओल नसल्यामुळे शेतकऱ्यांवर संकट निर्माण झाले आहे. या वर्षी शेतकऱ्यांनी कर्ज, उसनवारी करून बी-बियाणे, खते औषधी खरेदी केली. शेतकऱ्यांनी वेळेवर पेरणी केल्या; परंतु पेरणीनंतर वीस दिवस पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना पुन्हा दुबार पेरणी करावी लागली होती. पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कपाशीची पाने गळून पडली, कपाशी पूर्ण सुकून गेली आहे. पाऊस न झाल्याने पिकांची वाढ खुंटली. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठा फटका बसला आहे. सोयगाव तालुक्यासह सावळदबारा परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीवर केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे. तुरीच्या पिकाचेसुद्धा नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ मदत देण्याची मागणी शिवसेना उपतालुकाप्रमुख गुलाबराव कोलते व शेतकऱ्यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या