
हिंदुस्थानचा झुंजार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतला अखेर मलेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. चतुर्थ मानांकित चीनच्या ली शी फेंगने जेतेपदाच्या लढतीत अवघ्या 36 मिनिटांत श्रीकांतला पराभवाचा वेगवान धक्का देत जेतेपदावर आपली मोहोर उमटवली.
माजी अव्वल मानांकित 32 वर्षीय किदाम्बी श्रीकांतने पात्रता फेरीपासून अंतिम फेरीपर्यंत दमदार प्रवास केला. खराब फॉर्म आणि दुखापतीनंतर या हिंदुस्थानी खेळाडूने सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बीडब्ल्यूएफ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र, अंतिम फेरीत त्याला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. ली शी फेंगने त्याला 21-11, 21-9 फरकाने सरळ सेटमध्ये पराभूत केले. 2019 मधील इंडिया ओपननंतर श्रीकांत प्रथमच बीडब्ल्यूएफ स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळत होता. त्यावेळीही त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. 2021च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही श्रीकांतला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले होते. यावेळी तो फायनलमधील पराभवाची मालिका खंडित करील, असे वाटले होते. मात्र, ली शी फेंग ही चिनी भिंत भेदण्यात तो अपयशी ठरला.
अंतिम लढतीत मनासारखा खेळच झाला नाही
‘या आठवडय़ात मनासारखा खेळ झाला. यंदाच्या सत्रातील ही माझी तिसरी स्पर्धा होय. मागील दोन स्पर्धांतही चांगलीच कामगिरी झाली होती. या स्पर्धेत अंतिम लढतीत मनासारखा खेळ झाला नाही, मात्र ली शी फेंगला या विजेतेपदाचे श्रेय द्यावे लागेल. दुखापतीमुळे कारकीर्दीला अडथळे आले होते. अखेर कोर्टवर परतण्यात यशस्वी ठरलो, तर पोडियमवरही उभे राहता आले. त्यामुळे हा क्षण माझ्यासाठी खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरला.’
– किदाम्बी श्रीकांत