
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन याच्यानंतर देशाची धुरा कोणाकडे असेल, या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने (NIS) दावा केला आहे की, किम जोंग उन याने आपली मुलगी किम जु-ए हिची आपला उत्तराधिकारी म्हणून निवड केली आहे. तिला सध्या भविष्यातील सर्वोच्च नेत्या म्हणून विशेष प्रशिक्षण दिले जात असून सरकारी कार्यक्रमांमधील तिची वाढती उपस्थिती याचेच संकेत देत असल्याचे सांगण्यात आले आहे.
दक्षिण कोरियाच्या संसदेत सादर केलेल्या एका अहवालानुसार, किम जु-ए हिला मिळणारे राजशिष्टाचार आणि लष्करी कार्यक्रमांमधील तिचे स्थान पाहता, तीच किम जोंग उन याची वारसदार असल्याचे स्पष्ट होत आहे. किम जोंग उन याच्यासोबत ती अनेकदा आंतरखंडीय क्षेपणास्त्र चाचण्या आणि लष्करी संचलनांमध्ये आघाडीवर दिसून आली आहे.
किम जोंग उन याच्या प्रकृतीबाबत सातत्याने उलटसुलट चर्चा सुरू असतात. त्याचे वाढलेले वजन आणि धूम्रपानाच्या सवयीमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य आरोग्य समस्या लक्षात घेता, त्याने आत्तापासूनच सत्तेच्या संक्रमणाची तयारी सुरू केल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. किम कुटुंबाची ‘पॅक्टू’ रक्तपरंपरेची सत्ता अबाधित राखण्यासाठी जु-ए हिला जनतेसमोर आणि लष्करासमोर एक प्रबळ चेहरा म्हणून सादर केले जात आहे.


























































