
बहुचर्चित इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी फलंदाजीचा सराव मिळावा म्हणून के. एल. राहुल इंग्लंडमध्ये दाखल झालाय. तो हिंदुस्थान ‘अ’ संघाकडून उद्या शुक्रवारपासून सुरू होणाऱया दुसऱया अनधिकृत कसोटीत इंग्लंड लायन्सविरुद्ध खेळणार आहे.
हिंदुस्थानात पावसाळा सुरू झाल्याने के. एल. राहुलने कसोटी मालिकेपूर्वी सरावासाठी इंग्लंडमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. 20 जूनपासून हिंदुस्थान-इंग्लंडदरम्यान कसोटी मालिका सुरू होणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया उद्या (दि. 6) मुंबईहून इंग्लंडला रवाना होणार आहे. विराट कोहली व रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने आता लोकेश राहुल हाच सर्वात अनुभवी फलंदाज असेल. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याच्यावर मोठी जबाबदारी असेल. ‘टीम इंडिया’चा कसोटी कर्णधार शुभमन गिल व साई सुदर्शन यांनाही दुसरा चारदिवसीय सामना खेळायचा होता, मात्र आयपीएलमुळे त्यांना इंग्लंडमध्ये दाखल होता आले नाही. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी या दोघांना केवळ आपल्या संघातच सराव करण्याची संधी मिळणार आहे.
ऋतुराज, किशनला संधी मिळणार?
वेगवान गोलंदाज आकाश दीप दुसऱया अनधिकृत सामन्यात खेळणार आहे. यशस्वी जैसवाल, अभिमन्यू ईश्वरन व करुण नायर यांनी पहिल्या सामन्यात दमदार खेळी केल्या आहेत. त्यामुळे ऋतुराज गायकवाड व ईशान किशन यांना उद्यापासून सुरू होणाऱया दुसऱया सामन्यात संधी मिळू शकते. अष्टपैलू म्हणून शार्दुल ठाकूर व नितीश कुमार रेड्डी यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.
हिंदुस्थान ‘अ’ – अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जैसवाल, करूण नायर, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर, ईशान किशन, मानव सुतार, तनुष कोटियन, मुकेश कुमार, आकाश दीप, हर्षित राणा, अंशुल कम्बोज, खलील अहमद, ऋतुराज गायकवाड, सरफराज खान, तुषार देशपांडे, हर्ष दुबे.
इंग्लंड लायन्स – जेम्स रियू (कर्णधार), फरहान अहमद, जॉर्डन कॉक्स, रिकी फ्लिनटॉफ, एमिलियो गे, टॉम हॅन्स, जॉर्ज हिल, मॅक्स होल्डन, बेन मॅकिनी, एडी जॅक, अजितसिंह डेल, जोश टंग, क्रिस वोक्स.