
रानातील शेतमाल कापून घरी आणल्यानंतर शेतकरी आपले पशुधन चरण्यासाठी मोकळे सोडतात. हिंस्र प्राण्यांपासून जनावरांचे संरक्षण व्हावे, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही संगमेश्वर तालुक्यातील गावोगावी वाघबारस उत्साहात साजरी करण्यात आली.
तुळशी विवाहाच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच ५ नोव्हेंबर रोजी, शेतकऱ्यांनी निसर्गदेवतेची आराधना करून पशुधनाच्या रक्षणासाठी निसर्गाला प्रार्थना केली. या पारंपरिक सणातून निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्पर नात्याचे महत्त्व अधोरेखित होते. काळाच्या ओघात ही प्रथा काही ठिकाणी लोप पावत असली तरी ग्रामीण भागात ती आजही तेवढ्याच श्रद्धेने पाळली जाते. वाघबारसच्या आदल्या दिवशी गावातील गुराखी आणि पुजारी प्रत्येक घरातून तांदूळ, गूळ व थोडी रक्कम गोळा करतात. सणाच्या दिवशी गावातील पशुधन एकत्र आणून पूजा केली जाते. मुलांना वाघाचे रूप दिले जाते, तर गुराखी आपापल्या काठ्या सजवून या पारंपरिक खेळात सहभागी होतात.
‘वाघ रे वाघ रे’ अशा आरोळ्यांमध्ये वाघाचे प्रतीक असलेल्या सजवलेल्या मुलांना गावाबाहेर पळवून लावण्याची प्रथा पार पडते. त्यानंतर ग्रामदेवता व निसर्गाला ‘गुरे चरण्यासाठी जंगलात जात आहेत, त्यांना त्रास होऊ देऊ नको’ अशी प्रार्थना केली जाते.
“या परंपरेतून मानवाचं निसर्गाशी आणि वन्यप्राण्यांशी असलेलं नातं जपलं जातं. शेतकऱ्याच्या पशुधनाचं रक्षण निसर्ग आणि ग्रामदैवत करावं, अशी भावना या सणामागे आहे.”
एकनाथ बेटकर, ग्रामस्थ
































































