
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आज सकाळपासून संवर्धन देखभाल दुरुस्तीअंतर्गत मुख्य गाभाऱयाचे काम सुरू झाले. त्यामुळे देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन बंद करण्यात आले असून, या काळात भाविकांसाठी श्रींच्या प्राणप्रतिष्ठापीत मंगल श्रीकलश तसेच श्रींच्या उत्सवमूर्तीचे दर्शन मुक्ती मंडप (पितळी उंबरा) येथून करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मंगळवार (दि. 17) सर्व आगमोत्त व वेदोक्त धार्मिक विधी तसेच पूर्णाहुती संपत्र झाल्यानंतर दुपारच्या आरतीपासून श्री जगदंबेचे दर्शन पूर्ववत सुरू करण्यात येईल, अशी माहिती श्री करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळ आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून देण्यात आली. सध्या मंदिर संवर्धनांतर्गत मंदिरातील श्री महाकाली, श्री अंबाबाई व श्री महासरस्वती या तीनही गर्भगृहांचे अंतर्गत व बाह्य भागांचे जतन व संवर्धनाचे काम सकाळपासून सुरू करण्यात आल्यामुळे दर्शन व्यवस्था बंद करण्यात आली.
पूर्वानुभव पाहता, जबाबदारी कोणाची?
– पुरातत्त्व खात्याकडून श्री अंबाबाई मंदिराचे 143 कोटी निधीतून बाह्य आणि अंतर्गत संवर्धन देखभाल दुरुस्तीचे काम चालू आहे. यापूर्वी देवीच्या मूळ मूर्तीवर झालेल्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेमुळे वाद निर्माण झाले होते. आता मूळ गाभाऱयात संवर्धनाचे काम सुरू करण्यात येणार असून, नेमके किती कर्मचारी हे काम करणार आहेत? ते कोण आहेत? कशा पद्धतीने काम करणार आहेत? याबाबत काहीच माहिती देवस्थान समितीकडून देण्यात आली नाही. एकंदरीत मंदिरात चोहोबाजूंनी एकदमच संवर्धनाची कामे होत असली, तरी यामध्ये जर काही त्रुटी राहिल्या तर त्याची जबाबदारी कोण घेणार, कोणाला जबाबदार धरणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

























































