
बदलापूर, अकोला, मुंबईनंतर आता कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी आली आहे. करवीर तालुक्यातील शिये गावामध्ये एका 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. बदलापूर येथे दोन शाळकरी मुलींवर अत्याचारी घटना ताजी असताना अकोला आणि मुंबईमध्ये अशा प्रकारच्या घटना उघडकीस आल्या. त्यानंतर आता कोल्हापुरातही अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या कुटुंबासोबत करवीर तालुक्यातील शिये गावामधील रामनगर येथे रहात होती. बुधवार (21 ऑगस्ट) दुपारपासून ती बेपत्ता होती. बराच काळ शोध घेतल्यानंतरही ठावठिकाणा न लागल्याने कुटुंबीयांना पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर तिचा शोध सुरू झाला. बुधवारी रात्रभर तिचा शोध सुरू होता.
अखेर गुरुवारी दुपारी रामनगर जवळील एका हॉटेलच्या शेजारी शेतवाडीमध्ये तिचा मृतदेह आढळून आला. अत्याचार करून तिचा खून करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज असून पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
धक्कादायक म्हणजे विधानसेच्या तोंडावर आणलेल्या लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम कोल्हापुरात सुरू असतानाच ही घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले असून मुलींवरील अत्याचाराच्या घटनांना आळा कधी बसणार असा सवाल पुन्हा उपस्थित होत आहे.