कोल्हापूरात पावसाचा धुडगूस सुरूच, बारा बंधारे पाण्याखाली; मंगळवारी रेड अलर्ट

यंदा हवामान खात्याने दिलेला अंदाज खरा ठरवत जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या धुवांधार आणि संततधार पावसाचा धुडगूस अजुनही सुरूच आहे.पंचगंगा, कासारी, भोगावतीसह दुधगंगा नदीवरील तब्बल बारा बंधारे पाण्याखाली गेले असून,आणखी बंधारे पाण्याखाली जाऊन मार्ग बंद‌ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान जिल्ह्यात आज यलो अलर्ट दिल्याप्रमाणे पावसाने हजेरी लावली असली तरी उद्या मंगळवारी हवामान खात्याने जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे.अगोदरच ओलाचिंब झालेला कोल्हापूर जिल्हा आता गारठल्याचेही दिसून येत आहे.

ऐन उन्हाळ्याच्या मध्यावर वळवाच्या पावसाची अपेक्षा असताना,यंदा मान्सून सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात सर्वत्र संततदार आणि धुवाधार पावसाने झोडपून काढले आहे.जनजीवनावर त्याचा परिणाम झाला असुन,दोन दिवसांपासून पावसाचा जोर किंचितसा ओसरला असला तरी धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पातळीत वाढ होताना दिसत आहे.पंचगंगा नदी घाट पात्रातील मंदिरे पाण्याखाली गेली असून,या मंदिराची शिखरेच दिसून येत आहेत. जिल्ह्यातील लहान,मोठे व मध्यम धरण प्रकल्प बहुतांश चाळीस ते पन्नास टक्के भरलेली आहेत. यामधून अजूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही. कोणत्याही क्षणी पाटबंधारे विभागाकडून धरणामधून विसर्ग सुरू करण्याची शक्यता आहे.त्यात पावसाचा जोर आणखी वाढल्यास,नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान आतापर्यंत पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम,सुर्वे,रुई,इचलकरंजी आणि शिरोळ हे सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत.तर कासारी नदीवरील यवलुज, भोगावती नदीवरील हळदी,सरकारी कोगे व राशीवडे तर दूधगंगा नदीवरील सिद्धनेर्ली आणि दतवाड असे एकूण बारा बंधारे आतापर्यंत पाण्याखाली गेलेले आहेत.

नालेसफाई मोहिमेत प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा अडथळा

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने नालेसफाईची मोहीम जोरदार सुरू आहे. गेल्या आठवड्यात सुमारे 18 हजार मेट्रिक टन गाळ नाल्यातून काढल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत होता.पण पावसामुळे या दाव्या विषयी साशंकता निर्माण झाली होती. सध्या पावसाची संतधर असतानाही नालेसफाई मोहीम सुरूच आहे. नाल्यामध्ये पाण्याची पातळी वाढत असल्याने ही नालेसफाई करताना जेवढी अडचण येत आहे त्यापेक्षा नाले सफाई नंतर जमा होणारा प्लास्टिकचा कचरा डोकेदुखी बनला आहे. मोठमोठ्या चैनल मधून साफसफाई करताना प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा खच काही कमी होताना दिसत नाही.

कोल्हापूर महापालिकेचे शहरात सेंट्रल वॉर रुम सुरू

पंचगंगा नदीची पाणी पातळीत वाढ होत असल्याने, महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील स्थायी समिती सभागृहात सेंट्रल वॉर रुम आजपासून सुरु करण्यात आली आहे. महापालिकेने यापुर्वी अग्निशमन विभागसह गांधी मैदान, राजारामपुरी, छ.शिवाजी मार्केट, छ.ताराराणी मार्केट या चारही विभागीय कार्यालयामध्ये आपत्तीच्या काळात व्यवस्थापनेसाठी व पूर परिस्थितीच्या काळात नागरीकांच्या सोईसाठी मदत कक्ष सुरु केले आहे.यामध्ये वादळ/पावसामुळे पडलेली झाडे उचलणे, स्थलांतरीत ठिकाण, घराची पडझड, स्थलांतरासाठी ठिकाण व पूराच्या पार्श्वभूमीवर इतर मदतीसाठी हा वॉर रुम सुरू करण्यात आलेला आहे. पूराच्या कालावधीत शहरातील नागरीकांनी या वॉर रुमशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.