
कोल्हापूरात यंदा 40 ते 41 अंश सेल्सिअसच्यावर तापमान पोहोचलं होतं. त्यामुळे नागरिक गेल्या महिनाभरापासून उकाड्याने हैराण झाले होते. अशातच अवकळी पावसाने दमदार हजेर लावल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दुपारनंतर ढगांच्या प्रचंड गडगटासह झालेल्या अवकाळी पावसाने कोल्हापूरला चांगलेच झोडपून काढले. शहरातील मैदानांसह रस्ते जलमय झाले. गटारी, नाले अक्षरशः ओव्हरफ्लो झाले. काहींच्या घरात पाणी शिरले. तसेच वाहनधारकांची चांगली तारांबळ उडाली होती. पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असला तरी, रात्री उशिरापर्यंत अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याचे दिसून आले.
यंदा हवामान खात्याने दिलेला पावसाचा अंदाज तंतोतंत खरा होताना दिसत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे वातावरण दिसून येत आहे. रात्री अपरात्री तसेच पहाटेच्या सुमारास ठीक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळताना दिसून येत आहेत. सकाळी 11 नंतर सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी चारच्या सुमारास प्रत्यक्ष पावसास सुरुवात झाली. मेघगर्जनेसह तब्बल दोन तास मुसळधार झालेल्या पावसाने, कोल्हापूरकरांची दैना उडवल्याचे दिसून आले. गटारी नाल्यांमधून ओव्हर फ्लो झालेले पाणी रस्त्यावर आले होते तर, काही ठिकाणी मैदानांना आणि रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. जयंती नाला अक्षरशः ओसंडून वाहत होता. पावसामुळे काही ठिकाणी झाडे उनमळून पडल्याची माहिती समोर येत आहे. तर काही भागातील विद्युत पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला होता.