
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सध्या भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. देशातील अतिरेकी कारवाईच्या पार्श्वभूमीवर मंदिरात चारही दरवाजांवर मेटल डिटेक्टरसह असलेल्या प्रचंड सुरक्षा यंत्रणेचे तीन-तेरा वाजल्याचे आज दिसून आले. सकाळी मुंबईतील एक भाविक कमरेला रिव्हॉल्वर लावून सहजपणे मंदिरात दर्शन घेऊन पुन्हा बाहेर आला. त्याला सुरक्षा यंत्रणेतील कोणीच अडविले नसल्याचे फोटो समाजमाध्यमातून चव्हाट्यावर आल्यानंतर मंदिराच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करायचा की नाही याची पडताळणी सुरू होती.
दरम्यान, या आठवडाभरात तब्बल दहा लाखांहून अधिक भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
सध्या नाताळ सुट्टी आणि न्यू इयरनिमित्त गेल्या चार दिवसांपासून दररोज लाखो भाविक श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. मंदिरात प्रवेशासाठी चार दरवाजे असून, या चारही दरवाजांवर सुरक्षारक्षक तसेच जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे दोन-दोन पोलीस तैनात असतात. आज सकाळी एक बंदूकधारी भाविक मंदिरात जाऊन पुन्हा बाहेर आला. मंदिराच्या चारही दरवाजांवर मेटल डिटेक्टर तसेच डिजिटल यंत्रणा कार्यान्वित आहे. एखादे शस्त्र वा कोणतीही वस्तू या डिटेक्टरमधून गेल्यास विशिष्ट आवाज येतो. त्यानंतर यंत्रणा सतर्कही होते. दक्षिण दरवाज्यातून सकाळी मंदिरात प्रवेश केलेल्या भाविकाच्या कमरेला बंदूक होती. त्यावेळी मेटल डिटेक्टरमधून आवाज झाल्याचे डिजिटल यंत्रणेकडून सांगितले जात आहे. मग त्या भाविकाची पूर्ण तपासणी सुरक्षारक्षक वा पोलिसांनी का केली नाही? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

























































