देशात गुरुवारी स्वातंत्र्यदिन गल्लीपासून दिल्लीपर्यंत मोठय़ा उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे झाली तरीदेखील स्वातंत्र्यदिनी शिक्षकांना अनुदानासाठी आंदोलन करण्याची वेळ येत आहे. अनेक शिक्षकांनी शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा करून चक्रीय उपोषणामध्ये सहभाग घेतला.
शासनाने 12 जुलै 2024 रोजी शिक्षणमंत्र्यांनी सभागृहात जून 2024 पासून अनुदानाचा वाढीव 20 टक्के टप्पा दिला जाईल, अशी घोषणा केली होती. परंतु सदर घोषणेचा आदेश शासननिर्णयाद्वारे अद्यापही निघालेला नाही. शासनाने पुढील वाढीव टप्प्याचा अनुदान आदेश काढावा व 15 मार्च 2020चा जाचक संच मान्यतेचा आदेश रद्द करावा, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.
हाडाची काडे आणि रक्ताचे पाणी करून शिक्षक जगतोय. 20 वर्षांचा वनवास भोगला तरीही उपेक्षित आहे. शिक्षकांच्या वेदना, त्यांच्या कुटुंबीयांचा टाहो शासनाच्या प्रतिनिधींना दिसत नाही का? जर येणाऱया काळात आमचे प्रश्न सुटले नाहीत तर त्याचे परिणाम शासनास पाहायला मिळतील. त्यामुळे शासनाने आता आमचा अंत पाहू नये, वाढीव टप्पा अनुदानाचा शासननिर्णय काढावा, अशी शिक्षकांची भावना आहे.
यावेळी खंडेराव जगदाळे, शिवाजी कुरणे, केदारी मगदूम, यशराज गाडे, युवराज पाटील, सचिन मरळीकर, शिवाजी घाटगे, सुभाष खामकर, अनिल ल्हायकर, विनोद कोठावळे, अरविंद पाटील, सावंता माळी, अभिजीत कोतेकर, नेहा भुसारी, भाग्यश्री राणे, जयश्री पाटील तसेच कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.