
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर किंचित ओसरला आहे. शहर आणि परिसरात दिवसभर कडकडीत ऊन पाहावयास मिळत आहे, शिवाय धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाल्याने, नद्यांच्या पाणीपातळीत संथ गतीने घट होत आहे. यंदा दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडलेल्या पंचगंगेचे पाणी काल नवव्या दिवशी पात्रात परतले. आज सायंकाळी पाचपर्यंत पंचगंगेची पातळी 26 फूट तीन इंच झाली होती, तर 38 बंधारे पाण्याखाली गेले होते. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 340 घरांची पडझड झाली आहे, तर 19 गोठे बाधित झाले आहेत.
यंदा जिल्ह्यात 1 जून ते आतापर्यंत 427 मि.मी. पाऊस झाला असून, गेल्या वर्षी याच कालावधीत 219 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यंदा पावसाचे सरीसरीचे प्रमाण हे अधिक राहिल्याने 8 लघु व मध्यम धरण प्रकल्प शंभर टक्के भरली आहेत. जंगमहट्टी, जांबरे, घटप्रभा, आंबेओहोळ, सर्फनाला, धामणी, कोदे लपा हे छोटे धरण प्रकल्प शंभर टक्के भरलेली आहेत.
धरणांमधील आजचा पाणीसाठा टक्के, कंसात सध्याचा एकूण पाणीसाठा टीएमसीमध्ये आणि धरणातून होणारा विसर्ग पुढीलप्रमाणे –
राधानगरी – 82 टक्के (6.84) 3100 क्युसेक विसर्ग, तुळशी – 79 टक्के (2.75) 300 क्युसेक, वारणा – 82 टक्के (28.27) 4500 क्युसेक. दूधगंगा – 68 टक्के (17.26) 1600 क्युसेक. कासारी – 72 टक्के (2) 800 क्युसेक. कडवी – 88 टक्के (2.20) 240 क्युसेक. कुंभी – 75 टक्के (2.05) 300 क्युसेक. पाटगाव – 89 टक्के (3.32) 300 क्युसेक. चिकोत्रा 80 टक्के (1.22). चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, आंबेओहोळ, सर्फनाला, धामणी आणि कोदेलपा ही धरणे 100 टक्के भरली आहेत.
अलमट्टी धरणात 1 लाख 16 हजार 2 क्युसेक पाणी जमा होत आहे, तर अलमट्टीतून एक लाख क्युसेक पाणी विसर्ग होत आहे, शिवाय हिप्परगी धरणात 1 लाख 6 हजार 480 क्युसेक पाणी जमा होत असून, 1 लाख 5 हजार 730 पाणी विसर्ग होत आहे.