पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करा! युवासेनेची राज्यपालांकडे मागणी

454

राज्यात महापुराने तसेच परतीचा पाऊस लांबल्याने ओला दुष्काळ पडला आहे. खरीपाची पिके सडल्याने शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे. आर्थिक स्थिती खालावल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या मुलांची शिक्षणाची फी भरणेही अशक्य झाले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलांचे या वर्षीचे महाविद्यालयीन शैक्षणिक शुल्क माफ करावे अशी मागणी युवासेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राजभवन येथे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले. पूरग्रस्त तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे शासनमान्य पुरावे शैक्षणिक शुल्क माफीसाठी ग्राह्य धरण्यात यावेत, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. राज्यपालांनी याबाबत योग्य उपाययोजना केली जाईल असे आश्वासन यावेळी दिले.

या शिष्टमंडळात युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, सचिव वरुण सरदेसाई, दुर्गा शिंदे, कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे, अंकित प्रभू, पवन जाधव, रूपेश कदम, शीतल शेठ-देवरुखकर, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांचा समावेश होता.

आपली प्रतिक्रिया द्या