
मुलगीच झाल्याने वंशाला दिवा नाही, म्हणत सुनेचा छळ केल्याप्रकरणी सासरा आणि नणंदेवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तनुजा अभिषेक पुणेकर (रा.रंकाळा टॉवर, कोल्हापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या पोलिसांनी नणंद श्वेता संजय कुडाळ (४६,रा.कु़डाळ,जि.सिंधुदुर्ग) आणि सासरा सुरेश बापूसो पुणेकर (७२,रा.रंकाळा टॉवर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तनुजा पुणेकर यांचा १२ वर्षांपूर्वी अभिषेक यांच्याशी विवाह झाला. त्यांना १० वर्षांची मुलगी आहे.रंकाळा टॉवर येथील घरात त्या पती, मुलगी आणि सासऱ्यासोबत राहतात.रविवारी सासूचे वर्षश्राद्ध असल्याने घरी आलेल्या नणंद श्वेता कुडाळ यांनी तसेच सासऱ्याने सुनेशी वाद घातला. ‘वंशाला दिवा मुलगा पाहिजे होता. हिला मुलगी झाली. हिने या घरात राहू नये. घर सोडून निघून जावे,’ असे म्हणत तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला.
यापूर्वी अनेकदा उपाशी ठेवले. घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.श्वेता यांनी शिवीगाळ केली, तर सासऱ्यांनी झाडूने मारहाण केल्याची फिर्याद दाखल झाली आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पो.निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी दिली.



























































