कोलकाता येथील आर जी कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि निर्घृण हत्येनंतर देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मार्ड आणि आयएमएने संप पुकारला. त्यामुळे रुग्णांची मोठय़ा प्रमाणावर गैरसोय झाली. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली असून देशभरात निदर्शने सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली असून 20 ऑगस्ट रोजी या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे.
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला तसेच न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी पार पडणार असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. पोलीस तपासानुसार पहाटे 3 ते 5 दरम्यान डॉक्टर तरुणीवर बलात्कार करत तिची निर्घृण हत्या करण्यात आली.
डॉक्टर, प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांवर संशय
तरुणीवर कामाचा प्रचंड दबाव होता असे पीडित डॉक्टरच्या आईने म्हटले आहे. त्यांनी पोलिसांना जबाब दिला असून मुलीवर बलात्कार आणि हत्येमागे रुग्णालयात काम करणारे काही डॉक्टर आणि प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी असू शकतात असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.
डायरीमुळे अनेक प्रश्न उपस्थित
पोलिसांनी आतापर्यंत पीडित डॉक्टरची डायरी आणि तिच्या आईवडिलांकडून जी माहिती मिळवली त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून पीडिता तणावाखाली होती आणि एक प्रकारच्या दबावाखाली काम करत होती अशी नवी माहिती समोर आली आहे. आम्हाला 36 तास काम करावे लागते. यात काही नवी गोष्ट नाही. असेही तिने तिच्या डायरीत लिहिले आहे. दरम्यान, औषधांच्या रॅकेटबाबत तिला काही माहिती मिळालेली असू शकते, यातून तिची हत्या झाली का? असा प्रश्न तिच्या वडिलांनी विचारला आहे.