कोकणात लाचखोरी वाढली; 10 महिन्यांत 107 जणांना बेड्या, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सर्वाधिक कारवाई

कोकण विभागात १ जानेवारी ते १४ ऑक्टोबर या १० महिन्यांत ७१ प्रकरणांत १०७ लाचखोरांना बेड्या ठोकल्या आहेत. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्वाधिक ३६ प्रकरणे उघडकीस आणली आहेत. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १०, नवी मुंबई विभागाने १०, पालघर विभागाने ६, रत्नागिरी विभागाने ५ तर सिंधुदुर्ग विभागाने ४ प्रकरणे उघडकीस आणली आहेत.

भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रशासनातील लाचखोरीला आळा बसावा म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. परंतु लाचखोरी कमी होण्याऐवजी ती वाढत चालली आहे. बहुसंख्य सरकारी अधिकारी व कर्मचारी लाच घेतल्याशिवाय काम करत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते. तसेच अनेकजण त्वरित शासकीय काम करून घेण्यासाठी संबंधित लोकसेवकाला लाच देऊन मोकळे होतात. यामुळेही भ्रष्टाचार वाढत चालला आहे.

ठाणे लाचलुचपत दूरक्षेत्र हद्दीत येणाऱ्या कोकणातील ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे येतात. या जिल्ह्यांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी ते १४ ऑक्टोबरदरम्यान कोकण विभागात लाचखोरीची ७१ प्रकरणे उघडकीस आली. या प्रकरणांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळे रचत १०७ जणांना रंगेहाथ पकडले आहे.

ठाणे विभाग कारवाईत पुढे

सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्वात कमी कारवाई केल्याचे दिसून येते. तर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्वात जास्त लाचखोरीची प्रकरणे उघडकीस आणली आहेत. कोकण विभागात गेल्या वर्षी लाचखोरीची ५५ प्रकरणे उघडकीस आली होती. तर चालू वर्षात १४ ऑक्टोबरपर्यंत लाचखोरीची ७१ प्रकरणे उघडकीस आली आहेत. या आकडेवारीवर नजर टाकल्यास कोकण विभागात लाचखोरीत वाढ झाल्याचे निष्पन्न होत आहे.

जनजागृतीसाठी दक्षता सप्ताह

लाचलुचपत विभागामार्फत दरवर्षी दक्षता सप्ताह राबवला जातो. गर्दीची ठिकाणे, शाळा- महाविद्यालये, बस स्थानके आदी ठिकाणी नागरिकांशी संवाद साधून भ्रष्टाचाराच्या विरोधात पुढे येण्याचे आवाहन सप्ताहाच्या माध्यमातून करण्यात येते. पत्रके, पोस्टर, फलकांच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात येते.