दापोली हर्णे आंजर्ले केळशी मार्गावरील पाजपंढरीत शनिवारी दुपारी झालेल्या वाहुकोंडीने वाहन चालकांना आपल्या ताब्यातील वाहने कित्येक वेळ एकाच ठिकाणी उभी करून ठेवण्याची नामुष्की ओढवली तर पादचाऱ्यांना वाहतूक कोंडीमुळे दोन्ही दिशांकडे जाणारा मार्ग बंद पडल्याने मार्ग मोकळा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागली.
दापोली तालुक्यातील पाजपंढरी गावातुन हर्णे दापोलीकडे येणारा एक मार्ग आहे तर दुसरा पाजपंढरी गावातून आंजर्ले आडे केळशी मांदीवलीकडे मार्ग आहे. याच मार्गावरून ईळणे पंचक्रोशी तसेच सुकोंडी देहेणकडे जाणारा वाहतुकीसाठिचा महत्त्वाचा असा मार्ग आहे. रविवारच्या सुट्टीमुळे आज पर्यटकांच्या वाहनांची या मार्गावर वर्दळ वाढल्याने तसेच एस. टी. बस फे-या त्याचप्रमाणे खाजगी वाहनांसह अवजड वाहनांच्या झालेल्या वर्दळीने पाजपंढरी गावातून जाणारा मार्ग हा काही काळ बंद पडला. त्यामुळे या वाहतूक कोंडीचा सर्वानाच त्रास सहन करावा लागला. असे असताना ही ज्याला त्याला घाई कोणीही वाहन चालक आपल्या ताब्यातील वाहन मागे पुढे घेण्यास तयार नसल्याने या घटनेचा या मार्गावरून मार्गस्थ होणा-या वाहन चालकांना तर त्रास झालाच शिवाय या रस्त्यावरुन आपल्या ईप्सित स्थळी कामानिमित्त जाणाऱ्या पादचाऱ्यांना मात्र मोठाच त्रास सहन करावा लागला. त्यामुळे त्यांच्या वेळेचा अपव्यय झाला.