भूमिपुत्रांसाठी सुवर्णसंधी! कोकण रेल्वेत रिक्त पदांची भरती!

कोकण रेल्वेमध्ये 190 सेफ्टी कॅटेगिरीमध्ये खुल्या प्रवर्गातून भरती करावी अशा रेल्वे बोर्डाच्या आदेशाचे पालन कोकण रेल्वेने करावे आणि सध्या कोकण रेल्वेतील रिक्त कामगारांची कमतरता दूर करून नवीन कामगारांना भरती करावे या मागणीसाठी रेल कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच कोकण रेल्वेचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर संतोष पुमार झा यांची भेट घेतली. या संदर्भातले नोटिफिकेशन लवकरच काढण्याचे आश्वासन सीएमडी संतोष कुमार झा यांनी दिले. ज्यांच्या जमिनी कोकण रेल्वेमध्ये गेल्या आहेत अशा भूमिपुत्रांनाही यामध्ये नोकरी मिळू शकेल असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे भूमिपुत्रांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.

शिवसेना नेते, रेल कामगार सेनेचे अध्यक्ष विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सरचिटणीस दिवाकर देव यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस राजू सुरती लोबो, शमी दादरकर, विल्सन यांनी कोकण रेल्वे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर संतोष कुमार झा यांची भेट घेतली. या भेटीत गेले वर्षभर प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यात यश आले आहे. कोकण रेल्वेतील अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होत असून 2027 पर्यंत अडीच हजार पदे रिक्त होणार आहेत. या संदर्भात आतापासूनच पावले उचलून रेल्वे बोर्डाकडून लागणाऱया सर्व परवानग्या घेऊन या भरती प्रक्रियेसंदर्भात तयारी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी यांनी केली. कोकण रेल्वेसाठी लागणारे कर्मचारी आणि त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता धारण करून आतापासूनच परीक्षेच्या तयारीला लागा, असे आवाहन त्यांनी भूमिपुत्रांना केले.

 

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करा

कोकण रेल्वे ही तीन राज्यांमधून जात असल्याने प्रत्येक राज्याचा वाटा हा वेगवेगळा आहे; परंतु कोकण रेल्वे हे स्वतंत्र कोर्पोरेशन आहे. त्यामुळे काही वेळेला कामगारांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करून कोकण रेल्वे हा स्वतंत्र झोन बनवावा, अशी मागणीदेखील यावेळी रेल कामगार सेनेतर्फे करण्यात आली आहे.