कोकण विद्यापीठासाठी विद्यार्थ्यांचा कल जाणून घेणार,तीन महिन्यांचा अल्टिमेटम

443

कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ तयार करण्याबाबत 90 दिवसांत विद्यार्थ्यांचा कल जाणून घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. विद्यापीठाच्या कामकाज सक्षमीकरणासाठी उपकेंद्रांमध्ये दोन महिन्यांत स्वतंत्र संचालक नेमण्याची घोषणाही त्यांनी केली.

मुंबई विद्यापीठाच्या कक्षेमध्ये 800 महाविद्यालये आणि आठ लाख विद्यार्थी असल्यामुळे प्रशासनावर प्रचंड ताण आहे. तसेच कोकणातील, विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी दूर अंतरामुळे मुंबई विद्यापीठ गैरसोयीचे असल्याने कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ उभारण्याची मागणी करणारी लक्षवेधी सूचना सदस्य निरंजन डावखरे यांनी मांडली होती. लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान शिक्षक आमदार कपिल पाटील, शेकापचे जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांनी मात्र कोकणातील जनतेची स्वतंत्र विद्यापीठाची मागणी नाही अशी भूमिका मांडली. मुंबई विद्यापीठाचे नाव मोठे असल्याने याच विद्यापीठाशी संलग्न राहण्याची भूमिका  विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठाची मागणी लावून धरली. तेव्हा स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्याबाबत दोन मतप्रवाह असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यावेळी मान्य केले.

सिंधुदुर्गात विद्यापीठाचे उपकेंद्र 

मुंबई विद्यापीठाची उपकेंद्र सक्षमीकरणाची तसेच हेलपाटे कमी होऊन जलदगतीने कामे होण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी सदस्यांनी केली. यावर मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी आणि ठाणे उपकेंद्रांना सक्षम केले जाईल. तसेच सिंधुदुर्ग जिह्यात उपकेंद्र स्थापन करून येत्या दोन महिन्यांत सर्व उपकेंद्रांवर संचालक नेमण्याचे आश्वासन उदय सामंत यांनी दिले.

रायगडवासीयांसाठी मुंबई विद्यापीठ सोयीचे

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातील महाविद्यालयांनी स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापण्याची मागणी केली आहे. यावर राजकारण करण्याची आवश्यकता नाही असे सांगून उदय सामंत म्हणाले, स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय झाला तरी त्यात रायगडचा समावेश नसेल. स्वतंत्र कोकण विद्यापीठासंदर्भात झालेल्या बैठकांमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील काही महाविद्यालयांनी कोकणाला मुंबई  विद्यापीठाशीच संलग्न ठेवावे असे मत व्यक्त केले. त्यामुळे दोन वेगळे मतप्रवाह लक्षात घेता यासंदर्भात समिती नेमण्यात आली आहे. यात संस्थाचालक आणि प्राचार्यांचा समावेश असेल. तसेच विद्यार्थ्यांशी व्यापक चर्चा करूनच स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. 90 दिवसांत विद्यार्थ्यांचा कल जाणून घेतला जाईल. विद्यार्थी केंद्रस्थानी मानूनच यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या