कोपरगाव तहसील कार्यालयातून स्वातंत्र्य दिनाच्या (15 ऑगस्ट) दिवशी चोरट्यांनी 5.50 लाख रुपये किंमतीचे ट्रॉल्यांसह चार ट्रॅक्टर चोरून नेले. सीसीटीव्हीची चौफेर नजर असताना सुद्धा चोरी झाल्यामुळे महसूल प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैध गौण खनिज विरोधी पथकाने तालुक्यामध्ये विनापरवाना वाळू उत्खनन व वाळू वाहतूक करताना मिळून आलेले विलास भगीरथ चांडे यांच्या मालकीचा स्वराज्य कंपनीचा एक लाख किंमतीचा ट्रॅक्टर व ट्रॉली, सचिन मंडलिक थोरात यांच्या मालकीचा सोनालिका कंपनीचा एक लाख पन्नास हजार रुपये किंमतीचा ट्रॅक्टर व ट्रॉली, सचिन जाधव यांच्या मालकीचा एक लाख पन्नास हजार रुपये किंमतीचा ट्रॅक्टर व ट्रॉली आणि विलास अंबादास लांडे यांच्या मालकीचा एक लाख पन्नास हजार रुपये किंमतीचा स्वराज्य कंपनीचा ट्रॅक्टर असा एकूण पाच लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कारवाईत जप्त करण्यात आला होता. मात्र कोपरगाव तहसील कचेरीच्या आवारातून 14 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या दरम्यान हे चारही ट्रॅक्टर ट्रॉल्यासह चक्क प्रशासनाच्या नाकावर टिच्चून चोरून नेले. याप्रकरणी कारकून देवराम बुधा लांघे यांनी कोपरगाव शहर पोलिसात तक्रार दिली आहे. सदर तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल बबन तमनर हे पुढील तपास करीत आहेत.