उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात केदारनाथ मंदिराच्या सुमारे 4 किमी अलीकडे ढगफुटी झाली. ही घटना बुधवार रात्री 9 वाजता गौरीकुंडाच्या पुढे रामवाडा व जंगल चट्टीदरम्यान पायी मार्गावर घडली. यामुळे काही मिनिटांतच मुसळधार पाऊस झाल्याने पर्वतांवरून दरडी कोसळल्या. घटनेदरम्यान प्रवासी मार्ग रिकामे होते, पण मंदिर प्रांगण, रामवाडा, गौरीकुंडात प्रवासी होते. या ठिकाणी 200 पेक्षा जास्त भाविक अडकले असून यामध्ये कोपरगावातील 55 भाविकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. भाविकांची माहिती मिळताच आमदार काळे यांनी विचारपूस करत त्यांना धीर देण्याता प्रयत्न केला.
ढगफुटी झाल्यामुळे आणि दगडी ढिगाऱ्यांमुळे केदारनाथला पायी जाणाऱ्या मार्गाचे सुमारे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पादचारी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. भीमबली येथे सुमारे 150 ते 200 यात्रेकरू अडकले आहेत. मात्र अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पावसामुळे भूपतवाला, हरिद्वार, न्यू हरिद्वार, कंखल, ज्वालापूर येथील अनेक वसाहती आणि बाजारपेठांची दुरवस्था झाली आहे. दरम्यान या यात्रेत कोपरगावातील 55 भाविक असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आमदार आशुतोष काळे यांनी तातडीने चौकशी करत भाविकांशी संपर्क साधला. आमदार काळे यांनी चौकशी केल्यानंतर अडकलेल्या भाविकांना दिलासा मिळाला. यावेळी भाविकांनी येथील भयानक परिस्थितीची माहिती सांगितली. स्थानिक प्रशासन आम्हा सर्व भाविकांना सर्वोतोपरी सहकार्य करत आहे. आम्ही सर्वजण सुखरूप असून गुप्तकाशी जवळ नारायणकोट येथे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आपण आमची आस्थेवाईकपणे चौकशी केल्यामुळे आम्हाला निश्चितपणे पुढील प्रवासासाठी बळ मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
“प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील 48 तासांत उत्तराखंडमधील सात जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. हा इशारा मंगळवारी रात्रीपासून लागू झाला आहे. डेहराडून, टिहरी, पौरी, नैनिताल, हरिद्वार, उधम सिंह नगर आणि चंपावत जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, गडगडाट, विजांचा कडकडाट आ जोरदार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तेव्हा भाविकांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास संपर्क करा, कुठल्याही प्रकारचा धोका पत्करू नका, आहे तेथे सुरक्षित रहा, आणि सुखरूप माघारी परत या.” अशा काळजीवजा सुचना आमदार काळे यांनी कोपरगावातील भाविकांना दिल्या आहेत.