कोयनेच्या ‘स्टिलिंग बेसीन’ दुरुस्तीचे काम आणखी पाच दिवस चालणार! कृष्णेसह टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांवर पाणीटंचाईची स्थिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोयना धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘स्टिलिंग बेसीन’ हे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम आणखी तीन ते चार दिवस चालणार असल्याने कृष्णा नदीकाठासह टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांवर पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. धरणात पुरेसा पाणीसाठा असला तरी काम पूर्ण होईपर्यंत विसर्ग कमी ठेवावा लागत आहे. त्यामुळे कृष्णा नदीपात्रात पाण्याची पातळी कमी झालेली दिसून येत आहे.

‘स्टिलिंग बेसीन’मुळे सध्या कोयना धरणातून 2100 क्युसेक पाणी केडीपीएच टप्पा एक व दोनमधून सोडण्यात येत आहे, तर वारणा धरणातून 1770 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. सध्या कोयना धरणात 64.74 टीएमसी जिवंत पाणीसाठा आहे, तर वारणा धरणात 17.77 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.

उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची मागणी वाढत आहे. दरवर्षी पंधरा मार्चपासून धरणाच्या नदी विमोचकातून 1000 ते दीड हजार क्युसेस तसेच केडीपीएचमधून 2100 क्युसेस असा 3600 क्युसेक विसर्ग सोडला जातो. सध्या काम सुरू असल्यामुळे नदी विमोचकातून 1000 ते दीड हजार क्युसेक विसर्ग देता येत नाही.फक्त केडीपीएचमधून 2100 क्युसेक पाणी सोडले जात आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी लक्षात घेऊन कमी संख्येने पंप चालवणे हा सध्या एकमेव उपाय उरला आहे.

‘स्टिलिंग बेसीन’ म्हणजे काय

धरणातून पाणी सोडताना ते उंचावरून खाली पडते. खाली येताना पाण्यात प्रचंड ऊर्जा निर्माण होते. धरणातील दरवाज्यातून बाहेर पडताना पाण्यात पोटॅशनेल एनर्जी असते. ती खाली पडून आदळताना कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतरित होते. त्यामुळे खालील जमिनीची मोठय़ा प्रमाणात धूप होण्याची शक्यता असते. ही धूप कमी करण्यासाठी धरणाच्या तळाशी संरचना तयार केली जाते. तिला ‘स्टिलिंग बेसीन’ म्हणतात.  वेगवेगळ्या धरणांवर त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. कोयना धरणात तीन वर्षांपूर्वी मेटल लायनिंगचा पत्रा निघून पडला होता. त्यानंतर स्टीलिंग बेसिनचे काम मर्यादित झाले होते. त्यामुळे धरणाच्या पायाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. यावर्षी त्याची दुरुस्ती अत्यावश्यक असल्याने सातारा सिंचन मंडळाने पावसाळा संपताच हे काम हाती घेतलेले आहे.