नेपाळी पंतप्रधानांचे ओले ओले…! म्हणे प्रभू रामचंद्र नेपाळी, नेटकऱ्यांनी केली मनसोक्त धुलाई

1208

चीनच्या इशाऱ्यावर नाचणारे नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली हे खुर्ची जाण्याच्या भीतीने बहकले आहेत. समस्त हिंदूंचे आराध्यदैवत असलेले प्रभू रामचंद्र हे नेपाळी होते आणि हिंदुस्थानातील अयोध्या ही नकली असून खरी अयोध्या नेपाळमध्येच असल्याचा बिनडोक दावा ओली यांनी केला. ओली यांचे विधान सोशल मीडियावर झळकताच नेटकऱ्यांनी त्यांची बेदम धुलाई केली. खुद्द ओली यांचा स्वपक्ष असलेल्या नेपाळ कम्युनिस्ट पक्षानेही पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणी केली तर अयोध्येतील संत-महंतांनी हा आमच्या आराध्याचा अपमान असून ओली यांना असे तथ्यहिन दावे करणे शोभत नसल्याचे म्हटले आहे.

ओली यांनी पंतप्रधान निवासस्थानी भानू जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात हिंदूस्थानची अस्मिता, हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले प्रभू रामचंद्र हे नेपाळी असल्याचा जावईशोध लावला. एवढ्यावरच ओली थांबले नाहीत तर हिंदुस्थानातील अयोध्या ही नकली असून खरी अयोध्या ही नेपाळमध्ये वाल्मिकी आश्रमाजवळ असल्याचा दावाही केला.

नेपाळमध्ये जनकपूरच्या पश्चिमेला बीरगंजजवळ ठोरी नामक जागा असून तेथे वाल्मिकी आश्रम आहे. तेथे एक राजकुमार राहत होता. वाल्मिकीनगर नावाची जागा बिहारच्या चंपारण्यात असून त्याचा काही भाग नेपाळमध्ये येतो. हिंदुस्थान सांगत असलेल्या ठिकाणाहून राजाशी विवाह करण्यासाठी एवढ्या लांब जनकपूरला लोक कसे काय आले? त्याकाळी लोक विवाहासाठी लांब जात नसत अशी बडबडही केली.

नेपाळची बुद्धी भ्रष्ट झाली, अयोध्येतील संत भडकले

नेपाळ हा सदैव सनातन धर्माला मानणारा देश आहे. मात्र अलिकडच्या काळात चीनच्या नादी लागून नेपाळची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना असे बिनबुडाचे दावे करणे शोभत नाही, असा हल्लाबोल हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची गंभीर दखल घ्यावी असेही ते म्हणाले. तपस्वी आश्रमाचे महंत जगत्गुरू परमहंसाचार्य यांनीही ओली यांच्या विधानावरून संताप व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या