कुचांबे येडगेवाडी रस्त्याला जिल्हा प्रमुख मार्गाचा दर्जा

67

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

संगमेश्वर तालुक्यातील पाटबंधारे विभागाने गडनदी प्रकल्पाअंतर्गत तयार केलेला १६ कि.मी रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यासाठी पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली तुकाराम येडगे यांचे विशेष प्रयत्न सुरु होते. तांत्रिक मुद्यांची पुर्तता करत आव्हानात्मक दर्जोनत्त प्रस्ताव मंजुर करण्यासाठी पाठपुरावा केल्यामुळे अखेर या रस्त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या ताब्यात घेत जिल्हा प्रमुख मार्गाचा दर्जा दिला आहे. सध्या तालुक्यात एकुण ११ प्रमुख जिल्हा मार्ग असून तालुक्याच्या रस्ता लांबीत आता नव्याने १६ कि.मी ची वाढ करण्यात आली आहे. कुचांबे येडगेवाडी रस्त्याला मान्यता देत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्रालय स्तरावरुन शासन निर्णय जारी केला आहे.

संगमेश्वर तालुक्यात सध्या ११ प्रमुख जिल्हा मार्ग असून आरवली मुरडव कुंभारखाणी कुचांबे राजिवली रातांबी येडगेवाडी हा तालुक्यात तिस-या क्रमांकाचा जिल्हा मार्ग बनला आहे. आरवली माखजन करजुवे डिंगणी संगमेश्वर हा प्रमुख जिल्हा मार्ग सर्वात लांबीचा असून या मार्गाची लांबी ४५.१२० कि.मी आहे. तर आरवली मुरडव कुंभारखाणी कुचांबे राजिवली रातांबी येडगेवाडी या रस्त्याची लांबी आता ३३ झाल्याने हा मार्ग तिस-या क्रमांकावर आला आहे. तालुक्यातील इतर प्रमुख जिल्हा मार्गांची लांबी पुढीलप्रमाणे आहे खेरशेत कोकरे नायशी कासे पेढांबे रस्ता लांबी २५ कि.मी, विल्ये पोचरी उक्षी लांबी ०७.५०० कि.मी, तुरळ कडवई चिखली तांबेडी अंत्रवली कळंबस्ते मासरंग शाखेसह रस्ता लांबी २१ कि.मी, संगमेश्वर कसबा नायरी निवळी जिल्हा हद्दपर्यंत तिवरे शाखेसह लांबी २०.५०० कि.मी, पोचरी परचुरी कोळंबे नांदळज कोसुंब कुळ्ये फणसवळे रस्ता लांबी ३९ कि.मी, देवरुख ओझरे विघ्रवली सोनवडे मुचरी लांबी २५ कि. मी, देवरुख हडपुडे कुंडी रस्ता बेलारी शाखेसह लांबी १८ कि.मी, देवळे मेघी देवरुख रस्ता लांबी १६.१०० तालुक्यातील ११ प्रमुख जिल्हा मार्गांच्या यादीत कुचांबे ते येडगेवाडी या १६ कि.मी चा रस्त्याचा समावेश करण्यात आल्याने येथील ग्रामस्थांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

कुचांबे येडगेवाडी या रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा मिळावा म्हणून ऑगस्ट २०१७ पासून पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समिती सदस्य तुकाराम येडगे यांचा पाठपुरावा सुरु होता. डिसंबर २०१७ ला सार्वजनिक बांधकाम विभागाचे देवरुख अपअभियंता सागर कांबळे यांच्यासोबत जिल्हा नियोजन समिती सदस्य व उपसरपंच तुकाराम येडगे व सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटोळे यांनी पाहणी करत रस्ता दर्जोनत्त प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला होता. या प्रस्तावासाठी पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी योग्य मार्गदर्शन केल्याने या प्रस्तावाला गतीने मंजुरी मिळाली. या प्रस्तावासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांनी चांगले सहकार्य केल्याने पाठपुरावा करणे सोपे, असे जिल्हा नियोजन समिती सदस्य तुकाराम येडगे यांनी सांगीतले.

आपली प्रतिक्रिया द्या