
डावखुरा फिरकीवीर कुलदीप यादवसाठी इंग्लंड दौरा केवळ पिकनिक ठरला होता. तसेच आगामी आशिया कपमध्येही त्याच्यावर टीम इंडियाच्या संघ व्यवस्थापनाची मेहरबानी कमीच असेल. त्यामुळे तो पुन्हा नावडत्या खेळाडूंच्या यादीतच असण्याची शक्यता आहे. तसेच टी-20 फॉरमॅटमध्ये व्यवस्थापन बहुधा अष्टपैलू खेळाडूंनाच प्राधान्य देते, जे आपल्या धडाकेबाज फलंदाजीने संघाला खोली देऊ शकतात. त्यामुळे कुलदीपवर पुन्हा एकदा दुर्लक्ष होण्याची भीती माजी हिंदुस्थानी फिरकीवीर मनिंदर सिंग यांनी व्यक्त केलीय. तसेच कुलदीपला संधी दिली असती तर इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका हिंदुस्थान जिंकू शकला असता, असा दावाही त्यांनी केला.
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली, पण मनिंदर सिंग यांचा ठाम विश्वास आहे की, कुलदीप खेळला असता तर निकाल 3-1 असा हिंदुस्थानच्या बाजूने लागला असता. आपण ज्या गोलंदाजांना खेळवले, त्यांच्यासोबत इंग्लंडने चौथ्या डावात 371 धावांचा पाठलाग करणे नेहमीच शक्य होते. पण कुलदीप असता तर चित्र पूर्णपणे वेगळे दिसले असते. आपल्या निवडीचा दृष्टिकोन हा विजय मिळवण्याऐवजी पराभव टाळण्यावर होता. जर आपण खरोखर विजय मिळवू इच्छित असतो तर कुलदीप प्रत्येक कसोटीत खेळला असता. जागतिक क्रिकेटमध्ये त्याच्यासारखे खेळाडू फारच कमी आहेत. इंग्लंडचे फलंदाज त्याची गुगली किंवा लेग-ब्रेक अजिबात समजू शकले नसते. पहिल्या कसोटीत जर तो चौथ्या-पाचव्या दिवशी गोलंदाजी करत असता तर इंग्लंडला 371 धावांचा पाठलाग करणे शक्यच झाले नसते, असेही ते म्हणाले.
आगामी आशिया कपमध्येही कुलदीपकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यांच्या मते व्यवस्थापन अक्षर पटेल व वरुण चक्रवर्ती यांना प्राधान्य देईल. जर संघ दोन फिरकी गोलंदाजांसह उतरला, तर ते कुलदीपला निवडतील असे जराही वाटत नाही. कारण ते अक्षरला त्याच्या फलंदाजीमुळे आणि त्यासोबत वरुण चक्रवर्तीलाच अधिक पसंती देता, असेही त्यांनी स्पष्ट केले.