जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा डाव उधळला, कुपवाडामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मूतील डोडामधील दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर आता कश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव उधळला आहे. सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. जम्मू आणि कश्मीरमधील कुपवाडा जिह्यात नियंत्रण रेषेजवळ लष्कराने ही कारवाई केली.

हिंदुस्थानी लष्कराच्या चिनार कॉर्प्स याबाबत ट्विट केले आहे. जम्मू आणि कश्मीरच्या कुपवाडा जिह्यातील केरन सेक्टरमध्ये दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्याचक्षणी त्यांना रोखून त्यांचा खात्मा केला. सध्या इतर दहशतवाद्यांना पकडण्याचे अभियान सुरू आहे.

याआधी बुधवारी डोडामध्ये कस्तीगढमधील जद्दन बाटा गावात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांची चकमक झाली होती. या चकमकीत त्यात दोन जवान जखमी झाले होते. त्यानंतर जवांनांनी शोध मोहीम सुरू केली होती.

डोडोमध्ये दोन जवान जखमी

कस्तीगढमध्ये एक जवान गंभीर जखमी झाला होता. आता त्याची प्रकृती स्थिर आहे. खराब हवामान असूनही या जवानाला उधमपूरच्या कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.