कुवैतमध्ये इमारतीला भीषण आग, 49 हिंदुस्थानी कामगारांचा मृत्यू तर, 50 हून अधिक जखमी

हिंदुस्थानी कामगार राहत असलेलल्या कुवैतमधील एका सहा मजली इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीमधील सर्व रहिवासी एकाच कंपनीतील कर्मचारी आहेत. या दुर्घटनेमध्ये 49 हिंदुस्थानी कामगारांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

सदर घटना कुवैतच्या दक्षिणी अहमदी गव्हर्नरेटच्या मंगफ भागात असलेल्या सहा मजली इमारतीमध्ये घडली आहे. 160 जणांचं वास्तव्य असणाऱ्या इमारतीमधील लोक एकाच कंपनीमधील कर्मचारी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार इमारतीच्या स्वयंपाकघरात बुधवारी पहाटेच्या दरम्यान आग लागली. या भयंकर दुर्घटनेत 49 हिंदुस्थानी कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 50 हून अधिक जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कुवैतच्या हिंदुस्थानी दुतावासाने आपल्या ‘X’ या सोशल मीडिया अकाउंटवर त्या संदर्भात माहिती दिली. “आज हिंदुस्थानी कर्मचाऱ्यांशी निगडीत आगीच्या दुर्घटने संदर्भात दुतावासाने आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक +965-65505246 जारी केला आहे. सर्व संबंधितांना विनंती आही की या हेल्पलाइनशी संपर्क साधावा. दुतावासाच्या माध्यमातून शक्य ती सर्व मदत देण्यास दुतावास वचनबद्ध आहे”, अशी माहिती हिंदुस्थानी दुतावासाने दिली.

कुवैत टाइम्सने या घटनेचे वृत्त दिले आहे. कुवैतचे गृहमंत्री शेख फहद अल-युसूफ अल-सबाह यांनी सदर घटनेचा तपास पूर्ण होईपर्यंत इमारतीचा मालक, इमारतीचा सुरक्षारक्षक आणि कंपनीचा मालक यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत.