
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया करताना चुकीचा पर्याय निवडलेल्या लाभार्थींना आता दुरुस्तीसाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 31 मार्चपर्यंत होती. अनेक लाभार्थी महिलांचे ई-केवायसी पूर्ण न झाल्याने सरकारने ही मुदत एक महिन्याने वाढवून देण्याचा निर्णय घेतला. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार ही मुदतवाढ देण्यात आल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. राज्यातील सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी दुरुस्तीसाठी ही शेवटची संधी आहे. त्यामुळे पात्र महिलांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ सुरू ठेवावा, असे आवाहन आदिती तटकरे यांनी यावेळी केले.






























































