देवरुख जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानावर लाखोंचा खर्च; तरीही इमारत पडीक

देवरुख शहरातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या निवासस्थानावर लाखो रुपये खर्चुन दुरुस्ती करण्यात आली. मात्र, या इमारतींमध्ये आजतागायत एकही कर्मचारी वास्तव्यास नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सध्या या इमारती पडीक अवस्थेत असून वापराअभावी झपाट्याने खराब होत चालल्या आहेत. यामुळे ‘कर्मचारी राहत नसतील तर दुरुस्तीचा लाखो रुपयांचा खर्च कशासाठी?’ असा सवाल स्थानिक नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

2019 मध्ये या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानावर छप्पर दुरुस्ती व इतर कामांसाठी तब्बल 2 लाख 76 हजार 941 रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, आवश्यक सुविधा नसल्याने कर्मचारी या निवासस्थानात राहण्यास उत्सुक नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, देवरूख ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत बांधण्याचे काम हाती घेतले असताना, जवळपास दोन वर्षे याच कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानातून रुग्णालयाचा कारभार सुरू होता.

रुग्णालयाची नवी इमारत एक वर्षांपूर्वी वापरात आल्यामुळे रुग्णालयाचे कामकाज त्याठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. मात्र, आजही या जुन्या इमारतीवर रुग्णालयाचे लहान लहान फलक तसेचच लागलेले दिसत आहेत. सध्या या इमारतीकडे कोणतेही प्रशासनिक लक्ष नसल्याने नासधूस सुरू झाली आहे. उंदीर, साप, घुशी यांचा वावर वाढल्याने परिसर अस्वच्छ आणि धोकादायक बनला आहे.

एकेकाळी कर्मचाऱ्यांनी गजबजलेल्या या इमारती आज शून्य वापरामुळे उदासवाण्या दिसत आहेत. काही इमारती तर वाहनतळ म्हणून वापरल्या जात आहेत. कर्मचाऱ्यांनी वास्तव्य करायचेच नसेल तर, केवळ देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली सार्वजनिक निधीचा अपव्यय का केला जातो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत नागरीकांचा रोष वाढत असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दिशेने लक्ष केंद्रीत करून योग्य तो निर्णय घेणे गरजेचे बनले आहे.