धावपट्टीवर उतरता उतरता पुन्हा उडाले इंडिगोचे विमान, प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला!

अहमदाबाद दुर्घटना घडल्यापासून विमानांच्या बाबतीत रोजच्या रोज काही ना काही बातम्या येत आहेत. नागपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अशीच एक घटना घडली. लँडिंग करता करता इंडिगोची दोन विमाने पुन्हा हवेत झेपावली. या प्रकारामुळे प्रवाशांच्या काळजाचा ठोकाच चुकला.

बेंगळुरू-नागपूर आणि मुंबई-नागपूर या दोन विमानांच्या बाबतीत हा प्रकार घडला. ही दोन्ही विमाने नागपूर विमानतळाच्या रनवेवर उतरण्यासाठी अवघे काही सेपंद बाकी होते. मात्र धुक्यामुळे धावपट्टी स्पष्ट दिसत नसल्यामुळे दोन्ही विमानांना गो-अराऊंडच्या सूचना दिल्या. त्यानंतर लगेचच विमानांनी पुन्हा टेकऑफ केले. जवळपास 15 मिनिटे हवेत घिरट्या घातल्यानंतर ही विमाने धावपट्टीवर उतरली. दरम्यानच्या काळात प्रवाशांमध्ये घबराट उडाली. काही वेळाने नेमका प्रकार लक्षात आल्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

ढगाळ वातावरण व मुसळधार पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून विमान सेवेला फटका बसत आहे. नागपूरहून उड्डाण घेणाऱया व तिथे लँड होणाऱया विमानांचे वेळापत्रक कोलमडले आहे. हवामानामुळे राज्यात पुढील काही दिवस विमान सेवेत आणखी व्यत्यय येण्याची शक्यता विमानतळ अधिकाऱयांनी व्यक्त केली आहे.

अमेरिकेत हवेत विमानाला आग

येथे विमान उड्डाणानंतर काही वेळातच इंजिनला आग लागली. त्यानंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. डेल्टा एअरलाइन्सच्या डीएल446 विमानाने लॉस एंजिलिस विमानतळावरून अटलांटासाठी उड्डाण घेतले. त्यानंतर काही वेळातच इंजिनला आग लागली. हे  बोइंग 767-400 विमान होते. 18 जुलै रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे.