लॅरी एलिसन श्रीमंतांमध्ये दुसरे, मार्क झुकरबर्ग आणि जेफ बेजोस यांना टाकले मागे

अमेरिकेचे उद्योगपती आणि ओरॅकलचे अध्यक्ष लॅरी एलिसन यांची अवघ्या एका दिवसात 26 अब्ज डॉलरने संपत्ती वाढली आहे. यामुळे लॅरी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये दुसऱ्या स्थानी पोहोचले आहेत. त्यांनी जेफ बेजोस आणि मार्क झुकरबर्ग या दिग्गजांना मागे टाकले आहे. फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीश व्यक्तींच्या यादीत एलिसन यांची संपत्ती 243 अब्ज डॉलर इतकी झाली आहे, तर टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांची संपत्ती 411 अब्ज डॉलर आहे. ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

ओरॅकलच्या शेअर्सने उच्चांक गाठल्याने याचा जबरदस्त फायदा लॅरी एलिसन यांना झालाय. त्यामुळे त्यांनी थेट जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. ओरॅकलच्या शेअर्समध्ये 14 टक्के वाढ झाली असून या वाढीमुळे कंपनीचे बाजार भांडवल 104 अब्जांनी वाढले आहे. या समभाग वाढीमुळे एलिसन यांच्या संपत्तीत गुरुवारी 25 अब्ज डॉलर आणि शुक्रवारी 16 अब्ज डॉलर्सची वाढ झाली.

चार देशांच्या जीडीपीपेक्षा संपत्ती जास्त

एलिसन यांचे वय सध्या 80 वर्षे आहे. त्यांनी 1977 साळी ओरॅकलची स्थापना केली. 2014 पर्यंत त्यांनी कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहिले. ते आता कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) आहेत. त्यांच्याकडे ओरॅकलचे 41 टक्के शेअर्स आहेत. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, एलिसन यांची संपत्ती आता हंगेरी (237 अब्ज डॉलर), कतार (222 अब्ज डॉलर), युक्रेन (205 अब्ज डॉलर) आणि कुवेत (153 अब्ज डॉलर) या चार देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे. ओरॅकलने क्लाऊड कम्प्युटिंग आणि डेटा स्टोरेज क्षेत्रात आपली पकड मजबूत केली आहे.